‘कदम कदम बढाये जा’च्या तालावर छात्रांचे शिस्तबद्ध संचलन.. मध्यरात्री पडून गेलेल्या पावसामुळे साचलेल्या तळय़ामध्ये उमटलेले धवल वस्त्रातील छात्रांचे प्रतििबब.. सकाळच्या प्रसन्नदायी वातावरणामध्ये संरक्षणमंत्र्यांनी स्वीकारलेली मानवंदना.. डोळय़ांचं पातं लवेपर्यंत आकाशामध्ये झेपावणारी ‘सुपर डिमोना’ आणि ‘सुखोई’ ही लढाऊ विमाने.. आरोळय़ा देत हवेमध्ये टोप्या आणि मित्रांनाही भिरकावून देत पुन्हा झेलत आनंद व्यक्त करणारे छात्र.. ‘सदैव सैनिका पुढेच जायचे’ या गीताची प्रचिती देत ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’च्या (एनडीए) १२८ व्या तुकडीचे शनिवारी शानदार दीक्षान्त संचलन झाले.
प्रबोधिनीच्या १२८व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलनामध्ये ४०१ छात्रांनी सहभाग घेतला. यामध्ये भूतानचे आठ, अफगाणिस्तानचे पाच आणि मालदीवचा एक अशा १४ परदेशी छात्रांचाही समावेश होता. संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांनी या दीक्षान्त संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अशोक सिंह, प्रबोधिनीचे प्रमुख कमांडंट व्हाईस अॅडमिरल जी. अशोककुमार, उपप्रमुख मेजर जनरल अशोक आंब्रे या वेळी उपस्थित होते. र्पीकर यांच्या हस्ते अभिषेक कुमार सिन्हा याला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. निशांत फिलीप याला रौप्यपदक आणि राजेंद्रसिंह बिश्त याला कांस्यपदक प्रदान करण्यात आले. तर ‘नोव्हेंबर’ स्क्वाड्रनला ‘चीफ ऑफ स्टाफ बॅनर’ने गौरविण्यात आले.
र्पीकर म्हणाले, प्रबोधिनीतील प्रशिक्षणावर संरक्षण मंत्रालय खूश आहे. तुम्ही चांगले संचलनाचे दर्शन घडविले. देशाच्या रक्षणामध्ये योगदान देणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांचा अभिमान असून आपण सदैव त्यांच्या ऋणात राहू. भारत उत्तम भविष्याच्या उंबरठय़ावर आहे. सारे जग आपल्याकडे दिशा आणि मार्गदर्शनासाठी पाहात असून हे भविष्य तुमच्यातील नेतृत्वच घडविणार आहे. देशाला विचारी जवानांची आवश्यकता आहे. त्यासाठी शारीरिक आणि मानसिक कणखरतेबरोबरच शिस्त, नैतिकता आणि प्रामाणिकता या मूल्यांची जोपासना करावी. त्वरित निर्णयक्षमता, आकलनक्षमता आणि अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करण्याची तयारी ठेवत जे करू ते बरोबरच ही वृत्ती बाळगा. बाहय़ आक्रमण आणि अंतर्गत सुरक्षा याबरोबरच नैसर्गिक आपत्तीमध्येही आपल्याला उत्तम काम करीत देशसेवा बजावायची आहे.
संरक्षणमंत्री छात्रांशी गप्पांमध्ये रमले
प्रबोधिनीच्या दीक्षान्त संचलनानंतर संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर चहापान समारंभात छात्रांच्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी गप्पांमध्ये रममाण झाले. एरवी प्रमुख पाहुण्याला केवळ पदकविजेत्या छात्रांनाच भेटता येते. मात्र, र्पीकर यांनी मंत्रिपदाची वस्त्रे बाजूला ठेवत छात्रांच्या ठिकाणी जाऊन संवाद साधला. त्यांनी छात्रांची आणि पालकांचीही आपुलकीने चौकशी केली. एकाने आपले आडनाव गायकवाड असे सांगताच आपण कुठले असा प्रश्न र्पीकर यांनी केला. त्यांना सातारा आणि कोल्हापूर येथील गायकवाड याच आडनावाचे छात्र भेटले. त्यांच्याशी त्यांनी मराठीतून गप्पा मारल्या. तिसऱ्या छात्राने मी लातूरचा असे सांगताच भूकंप झाला होता तेव्हा मदतकार्यासाठी मी लातूरला आलो होतो, असे र्पीकर यांनी त्याला सांगितले. थेट संरक्षणमंत्र्यांशी संवाद साधता आल्याने छात्र आणि त्यांचे पालक खूश झाले होते.