मागील आठ ते दहा वर्षांमध्ये शेतीतील नुकसानीसाठी आठ ते दहा हजार कोटींची मदत करण्यात आली, मात्र शेतीतील गुंतवणुकीवर एक हजार कोटींचाही खर्च करण्यात आला नाही. पाणी व विजेच्या बाबतीत शेतीमध्ये पायाभूत गुंतवणूक केल्याशिवाय शेती शाश्वत होणार नाही, याची जाणीव शासनाला असल्याने शेतीतील या पायाभूत गुंतवणुकीवर भर देण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सदाभाऊ खोत यांनी लिहिलेल्या ‘बळीचा आक्रोश’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. गृह राज्यमंत्री राम शिंदे, भारपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार राजू शेट्टी, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, भाजपचे राज्य प्रवक्ते माधव भंडारी, ज्येष्ठ पत्रकार अनंक दीक्षित, साहित्यिक डॉ. सदानंद देशमुख आदी त्या वेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारावयाची असेल, तर शेतीक्षेत्रात पायाभूत गुंतवणूक झाली पाहिजे, हे ओळखूनच शासन काम करीत आहे. विकेंद्रित पाणीसाठे निर्माण केल्याशिवाय शेतीला शाश्वत पाणी मिळणार नाही, हे ओळखून गतवर्षी सहा हजार गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. शेतीसाठी मागेल त्याला वीजपुवठय़ाच्या बाबतीतही शासनाने भूमिका घेतली. त्याचप्रमाणे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले शेतकऱ्यांचे कृषिपंप येत्या मार्चपर्यंत देण्यात येतील व जूनपर्यंत चालू वर्षांतील कृषिपंप दिले जातील. शासन शेतकऱ्यांच्या मागे पूर्ण ताकदीने उभे असून, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्व त्या उपाययोजना करीत आहे. शेतकऱ्यांना दलाल व्यवस्थेतून बाहेर काढण्यासाठी कापसाचे उत्पन्न जास्त असलेल्या जिल्ह्य़ात एकात्मिक वस्त्रोद्योग पार्क विकसित करण्यास शासनाने सुरुवात केली आहे. त्यातून शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळण्याबरोबरच स्थानिक युवकांना रोजगार मिळणार आहे.
खोत म्हणाले, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे दु:ख जाणून घेऊन त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने काढलेल्या दुष्काळ दिलासा यात्रेतून मराठवाडा व विदर्भातील दुष्काळाने खचलेल्या शेतकऱ्यांचे विदारक चित्र जनतेसमार आले. त्यातूनच हे पुस्तक आकारास आले.