श्रीराम ओक shriram.oak@expressindia.com

वस्तीपातळीवरील लहान मुलामुलींच्या आरोग्यासाठी ‘निरामय’ ही सामाजिक संस्था झटत आहे. विनामूल्य आरोग्य सेवा देणाऱ्या या संस्थेने सुरुवातीला लहान बालकांच्या लसीकरणापासून कामाला सुरुवात केली. लसीकरण प्रकल्प, किशोरी शक्ती प्रकल्प, कुपोषण निर्मूलन प्रकल्प, आरोग्य विषयक जनजागृती कार्यक्रम आणि अंगणवाडी सेविका प्रशिक्षण कार्यक्रम या प्रकल्पांच्या माध्यमातून पुणे शहरातील वस्त्यांमधील लहान मुलामुलींना आरोग्यपूर्ण जीवन जगता यावे, यासाठी ही संस्था सातत्याने कार्यरत आहे.

design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत

पुणे शहरातील सर्व लहान मुलामुलींचे आरोग्यपूर्ण भावी आयुष्याचे स्वप्न निरामय संस्थेने २००७ साली पाहिले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने वेगळी सामाजिक बांधीलकी जपण्याचा संस्थेने निर्णय घेतला. पुणे शहरातील वस्त्यांमधील लहान मुलामुलींच्या आरोग्यासाठी विनामूल्य सेवा या बालकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी संस्थेने वाटचाल सुरू केली. पुणे शहरात उदरनिर्वाहासाठी येणारे गावागावातील असंघटित कामगार तसेच कोणत्याही प्रकारचे कौशल्य नसलेली कुटुंब चरितार्थासाठी पुण्यात येतात. पुणे शहराच्या एकूण लोकसंख्येपैकी ४२ टक्क्य़ांपेक्षा जास्त लोक वस्त्यांमध्ये राहतात. त्यातच सामावल्या गेलेल्या या कुटुंबांना अतिशय अपुऱ्या सोयी सुविधांमध्ये राहावे लागते, तसेच त्यांना लहान मुलामुलींच्या आरोग्याच्या गंभीर प्रश्नालाही तोंड द्यावे लागते. पालकांना बालकांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गरजा देखील पूर्ण करता येत नाहीत. या पाश्र्वभूमीवर ‘निरामय’ संस्थेने काम सुरू केले.

लसीकरण प्रकल्पांतर्गत तीन वैद्यकीय अधिकारी, सहा परिचारिका, तीन वाहन चालक, एक प्रकल्प प्रमुख या चमूच्या सहकार्याने तीन अद्ययावत फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून पुणे शहरातील १३५ वस्त्यांमध्ये आणि २२ बांधकाम क्षेत्रातील लहान मुलामुलींचे लसीकरण संस्था विनामूल्य करते. या फिरत्या दवाखान्यांवर येणाऱ्या प्रत्येक बालकाला नोंदणी क्रमांक दिला जातो. प्रत्येक बालकाचे लसीकरण कार्ड दोन प्रतींमध्ये तयार करण्यात येते. दर पाच आठवडय़ानंतर ठरलेल्या प्रत्येक भागामध्ये गाडी पुन्हा भेटीसाठी जाते. नवीन बालकांची नोंदणी व जुन्या बालकांना ‘फॉलोअप डोसेस’ दिले जातात. आतापर्यंत ६८ हजारपेक्षा अधिक बालकांची नोंदणी करण्यात आली असून ६२ हजारपेक्षा अधिक बालकांना ‘फॉलोअप डोसेस’ देण्यात आले आहेत. या सर्व बालकांच्या बरोबरीनेच गरोदर मातांना धनुर्वाताचे लसीकरण देखील केले जाते. तसेच या सर्वच बालकांची आरोग्य तपासणी नियमितपणे केली जाते.

तीस हजारपेक्षा जास्त किशोरींचे रुबेला लसीकरण संस्थेने विनामूल्य केले आहे. शासनाच्या ‘मीझल्स रुबेला’ विशेष मोहिमेत देखील संस्थेने सहभाग घेतला होता. या मोहिमेअंतर्गत पुणे शहरातील बांधकाम क्षेत्रातील मजुरांच्या बालकांचे मीझल्स रुबेला लसीकरण संस्थेने विनामूल्य केले आहे.

लसीकरण प्रकल्पाच्या बरोबरीनेच संस्थेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे किशोरी शक्ती प्रकल्प. पुणे शहरातील वस्त्यांमधील किशोरवयीन मुलींच्या सर्वागीण विकासासाठी विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन संस्था करते. वयात येणाऱ्या मुलींसाठी पुणे शहरातील २० वस्त्यांमध्ये दैनंदिन किशोरी वर्ग संस्थेमार्फत चालवले जातात. प्रार्थना, सूर्यनमस्कार, शाळेचा अभ्यास, मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असणारा उपक्रम, हस्तकौशल्ये, एक तास मैदानी खेळ आणि पसायदान असे या दैनंदिन वर्गाचे स्वरूप असते. हा दैनंदिन वर्ग नियमितपणे घेण्यासाठी या सर्व वीस वस्त्यांमध्ये वीस संघटिका संस्थेने नियुक्त केल्या आहेत. या संघटिका सर्व वस्त्यांमधील मुलींच्या गृहभेटी करून त्यांना दैनंदिन वर्गात घेऊन येतात.

संस्थेचा किशोरी वर्ग सुरू असलेल्या सर्वच वस्त्यांमधील मुलींसाठी व्याख्यानमाला, कौतुक सोहळा, करियर विषयक मार्गदर्शन, आरोग्य तपासणी, आहार व आरोग्य विषयक मार्गदर्शन, व्यवसाय प्रशिक्षण, क्रीडा शिबिर, नेतृत्व विकास शिबिर, निवासी प्रशिक्षण शिबिर असे कार्यक्रम संपूर्ण वर्षभर राबवले जातात. या शिवाय या मुलींसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना, पोहणे प्रशिक्षण कार्यक्रम, ट्रेकिंग, अभ्यास सहल असे अनेक कार्यक्रम मुलींच्या गरजा ओळखून आयोजित केले जातात. व्याख्यानमालेत मुलींना शालान्त परीक्षेसाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन तज्ज्ञ व्यक्तींकडून केले जाते. तसेच संपूर्ण वर्षभराचे दहावीच्या परीक्षेचे नियोजन कसे करायचे, अभ्यास करताना तणाव निर्माण होणार नाही यासाठीचे विविध उपाय या व्याख्यानमालेमध्ये शिकवले जातात.

आरोग्य तपासणी कार्यक्रमांतर्गत मुलींमधील रक्तक्षयाचे निर्मूलन करण्यासाठी या मुलींची संपूर्ण आरोग्य तपासणी विनामूल्य केली जाते. मुलींना आहार व स्वछतेबद्दल मार्गदर्शन केले जाते. संस्थेच्या दैनंदिन किशोरी वर्गात येणाऱ्या मुलींसाठी गेली चार वर्षे क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. या क्रीडा स्पर्धामध्ये १८ प्रकारच्या वेगवेगळ्या मैदानी खेळांच्या स्पर्धाचा समावेश असतो. दरवर्षी या स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या मुलींची संख्या सातत्याने वाढत आहे. पहिल्या वर्षी २२५, दुसऱ्या वर्षी ६४४, तिसऱ्या वर्षी १ हजार १५० आणि मागच्या वर्षी १ हजार ५०० पेक्षा जास्त मुली या क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी झाल्या होत्या.

अतिशय हुशार, गरजू व होतकरू अशा या मुलींना थोडे समुपदेशन करण्याची, त्यांचे प्रश्न आपुलकीने समजावून घेण्याची, त्यांच्या बरोबर मोठय़ा बहिणीसारखे खेळण्याची, वेळोवेळी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची गरज असते. हे काम  संस्थेच्या दैनंदिन किशोरी वर्गात नियमितपणे केले जाते. या कोणत्याही  उपक्रमांत सहभागी होण्यासाठी संस्था कोणत्याही प्रकारचे शुल्क सहभागींकडून आकारत नाही. संस्थेशी संबंधित मुलींना संगणक प्रशिक्षण, इंग्रजी, गणित, विज्ञान व भाषा शिकवण्यासाठी मार्गदर्शकांची आवश्यकता असते. अशा कार्याबरोबरच ज्यांना संस्थेचे उपक्रम पाहायचे असतील ते ७२४९८८७८६१ या भ्रमणध्वनीवर किंवा (०२०) २९८०७८६१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

संस्थेच्या सर्वच प्रकल्पांतील सहभागींसाठी सर्व सेवा विनामूल्य पुरवल्या जातात. दहावीच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी, तसेच मुलींना अर्थार्जनाचे वेगेवेगळे मार्ग समजावेत याचे प्रशिक्षण देण्यासाठी अनेक कार्यकर्ते स्वेच्छेने येथे येतात आणि संस्थेला सहकार्य करतात. मंगळागौरीच्या खेळांच्या माध्यमातून किशोरी वर्गातील विद्यार्थिनी त्यांच्या शैक्षणिक गरजा भागवतात.

आरोग्यसंपन्नता तसेच विद्यार्थिनींना स्वावलंबी बनविण्याबरोबरच त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित व्हावे यासाठी कार्य करणाऱ्या या संस्थेमुळे सुंदर आयुष्य अधिक सुंदरतेने जगण्यासाठी एक दृष्टी लाभेल हे नक्की.