न्यायालयाच्या आदेशानुसार कायम नियुक्ती मिळावी या प्रमुख मागणीसाठी ससूनसह राज्यभरातील सरकारी रुग्णालयांमधील बदली कामगार मंगळवारपासून (३ डिसेंबर) बेमुदत संपावर जाणार आहेत. ससूनमध्ये १०२ बदली कामगार कार्यरत असून त्यांच्या काम बंद आंदोलनामुळे रुग्णालयाच्या सेवांवर मोठय़ा प्रमाणावर ताण पडण्याची शक्यता आहे.
बदली कामगार कृती समितीच्या नागपूर येथे सोमवारी झालेल्या सभेत काम बंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचे कामगार प्रतिनिधी सुनिल आटोळे यांनी सांगितले. पुण्यासह मुंबई, मिरज, सांगली, नांदेड, आंबेजोगाई, यवतमाळ, नागपूर येथील सरकारी रुग्णालयांत एकूण २२०० बदली कामगार कार्यरत आहेत. यांतील बहुतेक सर्व बदली कामगारांनी काम बंद आंदोलनास संमती दिल्याचे आटोळे म्हणाले.
ससून सवरेपचार रुग्णालयात सध्या कामगारांची २८० पदे रिक्त आहेत. ससून रुग्णालयासह बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाची इन्फोसिस इमारत या तीन ठिकाणी मिळून कामगारांच्या ३८० जागा रिक्त आहेत. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णालयातील स्वच्छता सेवांवर कमालीचा ताण पडत असून सध्या कार्यरत असलेल्या कामगारांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे. अशा परिस्थितीत बदली कामगारांनी काम बंद केल्यास रुग्णालयाची स्वच्छता सेवा कोलमडण्याची भीती आहे. ससून रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. डी. जी. कुलकर्णी म्हणाले, ‘‘बदली कामगारांचा प्रश्न गंभीर आहे. या कामगारांनी काम बंद केल्यास रुग्णालयाच्या सेवांवर ताण पडणार आहे. रुग्णालयातील रिक्त पदे भरावीत यासाठी पूर्वीच प्रस्ताव पाठवला असून या प्रक्रियेत बदली कामगारांचा प्राधान्याने विचार व्हावा अशी रुग्णालयाची भूमिका आहे.’’
बदली कामगारांच्या अनुकंपा तत्वावरील वारसांना त्वरित कायम नियुक्ती मिळावी, सहाव्या वेतन आयोगाचा फरक मिळावा आणि प्रथम नियुक्ती दिनांकापासून कायम नियुक्ती मिळावी या बदली कामगारांच्या इतर मागण्या आहेत.