News Flash

सेवाध्यास : अवयवदानजागृती

अवयवदानासाठी व देहदानाबाबत जागरुकता निर्माण करण्यातही संस्था प्रयत्नशील आहे.

नागरिकांना आवश्यक मदत करण्याचे कार्यक्रम ट्रस्टतर्फे  वेळोवेळी आयोजित केले जातात.

श्रीराम ओक shriram.oak@expressindia.com

नेत्रदानाविषयी अनेकांना माहिती असते, पण डोळ्यांशिवाय किडनी, हृदय, स्वादुपिंड, यकृत, फुफ्फुसे आदी अवयवांच्या प्रत्यारोपणासंदर्भात फारशी माहिती नसते. अवयवदानाबरोबरच देहदानाविषयी जागरुकता निर्माण करण्याचे कार्य ‘शिरीष हरि कुर्लेकर चॅरिटेबल ट्रस्ट’ ही संस्था करते. या संस्थेच्या कार्याविषयी..

मृत्यूनंतर आपले शरीर वैद्यकीय महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी उपयोगी पडावे हा जसा अनेकांचा विचार असतो तसेच मृत्यूनंतर नेत्रदान, त्वचादान, अवयवयदान करण्याचीदेखील अनेकांची इच्छा असते. अशी इच्छा बाळगणाऱ्यांना त्या संबंधीचा अर्ज भरून द्यावा लागतो किंवा त्या व्यक्तीने आपली यासंदर्भातील इच्छा लिहून नातेवाईकांना सापडेल अशा ठिकाणी आवश्यक कागदपत्र ठेवणे गरजेचे असते. ज्या व्यक्ती निर्णय घेऊ शकतील त्या किंवा वारसदार यांच्याकडे सही करून देऊन ठेवलेला अर्ज किंवा लिखित इच्छापत्राद्वारे दानशूर व्यक्तीची इच्छा पूर्ण होण्यास कोणत्याही अडचणी येत नाहीत. अवयवदान जागृतीसह किडनीच्या आजारांना रोखण्यासाठी ‘शिरीष हरि कुर्लेकर चॅरिटेबल ट्रस्ट’ ही संस्था जनजागृती करते.

अवयवदानासाठी व देहदानाबाबत जागरुकता निर्माण करण्यातही संस्था प्रयत्नशील आहे. यासंदर्भातील अर्जदेखील संस्थेकडे उपलब्ध आहेत. अर्ज किंवा इच्छापत्राचे या दानामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. मृत्यू कोणाचा कधी येईल सांगता येत नसल्यामुळे १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्यांना अवयवदान किंवा देहदान करण्याची इच्छा आहे, त्यांनी आपले इच्छापत्र लिहून ते नातेवाईकांना सापडेल अशा ठिकाणी ठेवणे आवश्यक असते. अशा प्रकारे प्रक्रिया पूर्ण करून देहदान केलेले मृत शरीर वैद्यकीय संशोधन व वैद्यकीय शिक्षणासाठी उपयोगी पडते.

एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील निकामी झालेल्या अवयवाच्या जागी दुसऱ्या व्यक्तीचा अवयव प्रत्यारोपणाद्वारे बसवता येतो. अवयवदानाने हे शक्य होते. दात्याच्या शरीरातून तो अवयव काढून रुग्णाच्या शरीरात बसवला जातो. प्रत्येक अवयवाचे प्रत्यारोपण होऊ शकत नाही. किडनी, हृदय, स्वादुपिंड, यकृत, फुफ्फुसे इत्यादी अवयवांचे प्रत्यारोपण करता येते. यासाठीदेखील कायद्याद्वारे काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच मेंदू मृत झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून एखादा अवयव काढल्यानंतर तो अवयव अधिक वेळ न दवडता, गरजवंताच्या शरीरात रोपण केला जातो. प्रत्यारोपणासाठी सुयोग्य नियोजनाची जशी गरज असते, तसेच नातेवाईकांना अवयवदानाविषयीची योग्य प्रकारे माहिती देणेदेखील आवश्यक असते. या सगळ्या गोष्टींसाठी वैद्यकीय अभ्यासाबरोबरच कायद्यांची माहितीदेखील समुपदेशकाला असणे जरुरीचे असते. या दोन्हींची सुयोग्य माहिती मेंदू मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना देण्याचे कार्य संस्थेमार्फत केले जाते.

दान करणाऱ्यांचे दोन प्रकार असतात. त्यापैकी एक दाता जिवंत असतो तर दुसऱ्या प्रकारामध्ये दात्याचा मेंदू मृत असतो, त्यावेळी त्या रुग्णाच्या नातेवाईकांना निर्णय घेऊन अशा प्रकारे अवयवदान करता येऊ शकते. जिवंत दाता म्हणजे अशी व्यक्ती जी पेशींचे दान करते आणि तिच्या शरीरात त्या पेशी नव्याने निर्माण होतात. यातीलच दुसरा प्रकार म्हणजे शरीरातील अवयवांच्या जोडीपैकी एक अवयव दान करणे. (उदा. किडनी, यकृताचा भाग) असे केल्याने दात्याच्या शरीराचे कार्य दुसऱ्या अवयवाद्वारे सुरू राहते.

मेंदू मृत म्हणजे जिचा मेंदू मृत झाल्याचे घोषित केले गेले आहे आणि अवयव काढेपर्यंत जिला कृत्रिम आधाराने जिवंत ठेवले गेले आहे, अशी व्यक्ती. कृत्रिम आधार देणे गरजेचे असते, कारण त्यामुळेच शरीरातील रक्तप्रवाह सुरू राहतो आणि प्रत्यारोपणासाठी अवयव उपयुक्त अवस्थेत राहतो. अवयवदान मृत्यूनंतर केलेले असो अथवा जीवित असताना, याबाबत सर्वात आधी वैद्यकीय सल्ला महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर समुपदेशकाच्या माध्यमातून यासंदर्भात गुप्तता पाळूनच हे दान केले जाते. या दानामध्ये रक्ताच्या नात्यात येणाऱ्यांना म्हणजे आई, वडील, भाऊ, बहीण यांना प्राधान्य असते. त्यानंतर पत्नीचा विचार ग्राह्य़ धरला जातो.

किडनीच्या आजारांबाबत जागरुकता निर्माण करणे हे कार्यदेखील संस्था जाणीवपूर्वक करते. किडनीच्या सर्व आजारांबाबत प्रतिबंधक उपाय घेण्यासाठी संस्था समुपदेशन करते तसेच संस्थेमार्फत डायलिसिसवर असलेल्या रुग्णांना आर्थिक सहाय्य मिळवून दिले जाते. गरजू रुग्णांना मोफत डायलाझर मिळवून देणे, आजारांबाबत मार्गदर्शन आणि समुपदेशन करणे, आजारापासून दूर राहण्यासाठी जागृती अभियान राबविणे, किडनी प्रत्यारोपणाबाबतची जागरुकता निर्माण करणे व गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्याचे कार्य संस्थेमार्फत सुरू असून मीना कुर्लेकर या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. त्यांच्याशी तुम्ही  (०२०) २४४५४६५८ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संवाद साधू शकता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 1:07 am

Web Title: organ donation awareness
Next Stories
1 टोळक्याची दहशत; तरुणाचा पाठलाग करुन खुनाचा प्रयत्न
2 आनंद तेलतुंबडे बद्दलचे मेल बनावट, बचाव पक्षाच्या वकिलाचा दावा
3 पुण्यात भटक्या श्वानांची सामूहिक हत्या; सोसायटीतील व्यक्तीनेच कृत्य केल्याचा संशय
Just Now!
X