पुणे विभागात महावितरणची शून्य थकबाकी मोहीम सुरू

पुणे परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणच्या शून्य थकबाकी मोहिमेला मंगळवारी सुरुवात करण्यात आली. या मोहिमेसाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली असून, वीजबिल थकविलेल्या ग्राहकाचा वीजपुरवठा तोडण्यात येणार आहे. १५ नोव्हेंबपर्यंत या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. थकबाकी भरा अन्यथा अंधारात राहा, असा संदेश थकबाकीदारांपर्यंत पोहोचविण्याचा या मोहिमेचा उद्देश असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे आणि मुख्य अभियंता एम. जी. िशदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे एक हजार जनमित्रांनी मंगळवारी थकबाकी वसुलीचा निर्धार केला. सेनापती बापट मार्गावरील प्रकाशभवनात मोहिमेपूर्वी जमलेल्या हजारो जनमित्रांशी ताकसांडे यांनी थेट संवाद साधला. ते म्हणाले, की महावितरणची थकबाकी मोठय़ा प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे थकबाकी वसुली ही प्रत्येकाची सर्वोच्च जबाबदारी असली पाहिजे. जनमित्र हे महावितरणचे आधारस्तंभ आणि सनिक आहेत. मात्र आता महावितरणच्या अस्तित्वासाठी थकबाकीविरोधात लढा देण्याची वेळ आलेली आहे. त्यासाठी कर्तव्यनिष्ठेने थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. एक तर थकीत वीजबिल ताबडतोब भरा अन्यथा अंधारात राहा, असा प्रत्ययच थकबाकीदारांना द्यावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

मंगळवारी रास्ता पेठ, गणेशिखड आणि पुणे ग्रामीण मंडलमधील जनमित्रांना ‘मोहीम शून्य थकबाकी’च्या महत्त्वासह महावितरणच्या आíथक परिस्थितीबाबत माहिती दिली. सुमारे २५ ते १०० जणांच्या एका पथकाद्वारे थकबाकीदारांची संख्या अधिक असलेल्या पुणे परिमंडलातील उपनगर, परिसर, मोठय़ा सोसायटय़ा, गावे आदी ठिकाणी सकाळी साडेनऊ वाजता धडक मोहीम सुरू केली.

पुणे परिमंडलातील पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यात सद्य:स्थितीत ७ लाख ८८ हजार घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांकडे १७४ कोटी ४८ लाख रुपयांची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी येत्या १५ नोव्हेंबपर्यंत मोहीम शून्य थकबाकीच्या माध्यमातून विशेष वीजतोड मोहीम राबविण्यात येणार आहे. वीजग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. ‘मोहीम-शून्य थकबाकी’मध्ये थेट अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, लेखा अधिकारी तसेच हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत. आठ दिवसांच्या मोहिमेसाठी वरिष्ठ कार्यालयातील अभियंते, अधिकारी यांचेही विशेष पथक तयार केले आहे.

वीजबिल भरा, कारवाई टाळा

थकीत वीजबिलांचा भरणा केला नाही तर संबंधित ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणार आहे. ही कारवाई टाळण्यासाठी थकीत वीजबिलांचा त्वरित भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. थकीत वीजबिल भरण्यासाठी स्थानिक वीजबिल भरणा केंद्रांसह घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने महावितरणचे www.mahadiscom.in हे संकेतस्थळ तसेच मोबाईल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे.