‘पॅडी आर्ट’मधून श्रीकांत इंगळहळ्ळीकर यांचा अनोखा प्रयोग

निसर्गाच्या कुशीत अनेक प्राणी, पक्षी, जीव राहतात. मात्र, त्यांचेच चित्र निसर्गाच्या कॅनव्हासवर चितारण्याचा अनोखा प्रयोग हौशी वनस्पती शास्त्रज्ञ श्रीकांत इंगळहळ्ळीकर यांनी केला आहे. यंदा सलग चौथ्या वर्षी त्यांनी ‘पॅडी आर्ट’ अर्थात भातशेतीच्या माध्यमातून ‘चापडा’ सापाचे भव्य चित्र साकारले आहे. हिरव्या रंगाखेरीज त्रिकोणी डोके आणि अगदी कमी जाडीची मान हे वैशिष्टय़ असणारा हा साप कारवीच्या झुडपात सापडतो.

सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बु. येथे ही कलाकृती साकारली आहे. इंगळहळीकर यांनी जपानमधील हे ‘पॅडी आर्ट’ प्रथमच पुण्यात आणले. गेल्या वर्षी त्यांनी यातूनच गणपती, काळा बिबटय़ा आणि पाचू कवडा तयार केला होता. ‘पॅडी आर्ट’ साकारताना जमिनीचा एका कॅनव्हाससारखा वापर केला जातो आणि विविध रंगातील भाताची रोपे लावून रंगसंगती साधली जाते. जोराच्या पावसात गुडघाभर पाण्यात उभे राहून दोन रंगांच्या भातपिकाची पेरणी करणे हे आव्हानात्मक काम असते. यंदा ‘चापडा’ या पश्चिम घाटात सापडणाऱ्या दुर्मीळ सापाची १२० बाय ७० फूट आकाराची प्रतिमा सादर केली आहे. माथेरान, भीमाशंकर, महाबळेश्वर, कोयना, आंबोली व गोवा अशा सावलीच्या जंगलात चापडा साप आढळतात. लहान-मोठय़ा झाडांच्या फांद्यांवर आढळणाऱ्या या सापाचे उंदीर, सरडे, झाडावरील बेडूक हे खाद्य असते.

जपानमधील भातशेतीला दोन हजार वर्षे पूर्ण

दक्षिण जपानमधील ओमोरी जिल्ह्य़ातील इनाकादाते या गावात या कलेचा जन्म झाला. या भागात वर्षांनुवर्षे भातशेती केली जाते. ही शेती कोणत्याही यंत्राच्या वापराविना केली जाते. काही वर्षांपूर्वी या भातशेतीला दोन हजार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तेथील शेतकऱ्यांनी उत्सव साजरा करायचे ठरवले आणि त्यातूनच ही कला लोकप्रिय झाली आहे.