दोन गटाच्या वादामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्याची पिंपरी पालिकेवर नामुष्की

पिंपरी महापालिकेच्या वतीने थेरगावात उभारण्यात आलेल्या ‘सब वे’च्या नामकरणावरून सोमवारी भर रस्त्यात दोन गटात बराच ‘तमाशा’ झाला. शाब्दिक वादावादीपासून ते एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडल्याने मोठा तणाव निर्माण झाला. परिणामी, उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्याची वेळ महापालिकेवर आली. वादावादीच्या या प्रकारामुळे थेरगाव रस्त्यावर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता.

सांगवी किवळे रस्त्यावर थेरगावच्या कावेरीनगर येथे ‘सब-वे’ बांधण्यात आला आहे, त्यासाठी सुमारे सहा कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे. जानेवारी २०१७ मध्ये या कामाचे आदेश देण्यात आले होते, त्याची मुदत १० महिने होती. मात्र, रस्त्यातील उच्चदाब वाहिनी वेळेत स्थलांतरित न झाल्याने बराच विलंब झाला. मुदतवाढ मिळाल्यानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये हे काम पूर्ण झाले. प्रकल्पाला कोणते नाव द्यायचे, यावरून मतभेद होते. त्यावर तोडगा निघाला नसताना सोमवारी अतिशय गोपनीयता बाळगून उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तेव्हा हे दोन्ही गट आमने-सामने आले व त्यांच्यात वाद सुरू झाले. शाब्दिक वादावादीतून अंगावर धावून जाण्यापर्यंत प्रकार झाले. रहदारीच्या रस्त्यावरच हा प्रकार सुरू झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कोणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता दिसू लागली. अखेर, पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यानंतरही बराच काळ धुसफूस सुरू होती. अखेर, कोणाचेही नाव न देता उद्घाटनाचा सोहळा रद्द करण्याची भूमिका पालिकेने घेतली. नागरिकांना वाहतुकीसाठी हा रस्ता खुला करण्यात आला. यासंदर्भात, अधिकाऱ्यांनी कोणतेही भाष्य करण्याचे टाळले. वाहतुकीची कोंडी टाळण्याच्या हेतूने हा सब-वे तयार करण्यात आला,मात्र नामकरणाच्या वादामुळे उद्घाटनाच्या दिवशीच वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.