पवना धरणातील पाणीसाठय़ात झालेली मोठी वाढ व सततच्या पावसामुळे यापूर्वी केलेली पाणीकपात मागे घेण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पाणीबचतीची चांगली सवय लावण्याच्या हेतूने एक वेळ पाणीपुरवठय़ाचेच धोरण कायम ठेवावे, असा सूर नगरसेवकांकडून होत असतानाच पूर्वीप्रमाणे दोन वेळ पाणी देण्याची मागणीही पुढे आली आहे. त्यामुळे गटनेत्यांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्याचे सूतोवात आयुक्तांनी केले आहेत. दरम्यान, बंद केलेले जलतरण तलाव तातडीने सुरू करण्याची मागणी क्रीडा समितीचे सभापती जितेंद्र ननावरे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
पाणीकपातीचे धोरण म्हणून पालिकेने दोन वेळ असलेला पाणीपुरवठा एक वेळ केला होता. त्यानुसार, काही दिवस दिवसाआड पाणी देण्यात आले. संततधार पाऊस व धरणसाठय़ात वाढ झाल्यानंतर दिवसाआड होणारा पाणीपुरवठा पुन्हा एक वेळ करण्यात आला. आता पवना धरणात ९० टक्के साठा आहे. पावसाची संततधार कायम आहे. पवनेला पूर येण्यासारखी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत, पाणीकपात धोरणाचा फेरविचार करण्याची मागणी होत आहे. मंगळवारी झालेल्या पालिका सभेत नगरसेवकांनी एक वेळ आणि दोन वेळ पाणीपुरवठा करण्याविषयी दोन्ही बाजूने मते मांडली. प्रशासनाचा मात्र एक वेळ पाणी ठेवण्याचा विचार आहे. तथापि, लोकप्रतिनिधींची सहमती आवश्यक असल्याने गटनेत्यांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्याची भूमिका आयुक्तांनी घेतली आहे. दरम्यान, महापालिकेचे बंद केलेले १० तलाव पुन्हा सुरू करण्याची मागणी ननावरेंनी आयुक्तांकडे केली. राज्यात व राष्ट्रीय स्तरावर जलतरण स्पर्धा होत आहेत. शहरातील खेळाडू त्यात सहभागी होणार आहेत. सरावासाठी एकही तलाव उपलब्ध होत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. या परिस्थितीचा विचार करून तलाव पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी ननावरेंनी केली आहे.