पालिकेचे ‘टॉयलेट लोकेटर’ अ‍ॅप; पहिल्या टप्प्यात ५३६ स्वच्छतागृहांची माहिती

पिंपरी-चिंचवड शहरात कुठे स्वच्छतागृहे व शौचालये आहेत, याची माहिती एकाच क्लिकवर देणारे ‘टॉयलेट लोकेटर’ हे अ‍ॅप महापालिकेने विकसित केले आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील जवळपास ५३६ स्वच्छतागृहांची माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. गजबजलेल्या तसेच दाट लोकवस्ती असलेल्या भागात शौचालय न सापडल्याने होणारी गैरसोय दूर होणार आहे.

केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सार्वजनिक व सामुदायिक शौचालये दर्शवणारे ‘टॉयलेट लोकेटर’ अ‍ॅप विकसित करून ते उपयोगात आणण्यात येत आहे. नागरिकांची कुचंबणा दूर करणे, त्यांना महत्त्वपूर्ण अशी आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देणे हा त्यामागे हेतू आहे.

पेट्रोलपंप, मॉल, दवाखाने, रेल्वे स्थानके, बसस्थानके आदी ठिकाणी असणाऱ्या शौचालयांची व स्वच्छतागृहांची एकत्रित माहिती यामध्ये समाविष्ट करण्यात येते. आतापर्यंत देशातील दिल्ली, गुरगाव, फरिदाबाद, गाझियाबाद, नोएडा, इंदूर, भोपाळ या शहरांमध्ये हा प्रयोग राबवण्यात आल्याचा व बहुतांश तो यशस्वी झाल्याचा दावा करत पिंपरी पालिकेनेही त्याचा अवलंब केला आहे.

यासंदर्भात, सहआयुक्त दिलीप गावडे यांनी सांगितले, की अशाप्रकारचे अ‍ॅप विकसित करणारी पिंपरी-चिंचवड ही महाराष्ट्रातील पहिलीच महापालिका आहे. या माध्यमातून नागरिकांची विशेषत: महिलांची सोय होणार आहे. शहरात स्वच्छतागृहे व शौचालयांची संख्या अडीच ते तीन हजारापर्यंत असल्याची नोंद महापालिकेकडे आहे. ही माहिती ‘गुगल मॅप’वर टाकण्यात येत आहे. तत्पूर्वी, महापालिकेच्या वतीने रीतसर सर्वेक्षण करण्यात आले आहे. या अ‍ॅपद्वारे जवळची स्वच्छतागृहे शोधणे सोपे जाणार आहे. स्वच्छतागृह असलेला प्रभाग क्रमांक, स्वच्छतागृहाचा प्रकार, सविस्तर पत्ता, वेळ व इतर माहिती या अ‍ॅपद्वारे मिळणार आहे.