पिंपरी- चिंचवडमधील पिंपळे गुरव येथे माथेफिरुने वाढदिवसाच्या दिवशी एका व्यक्तीला भेटवस्तू म्हणून चक्क कोंबडीचं मुंडकं आणि पत्त्यांमधील जोकर पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे गेल्या पाच दिवसांपासून ते कुटुंबीय भीतीच्या सावटाखाली वावरत असून याप्रकरणी सांगवी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पिंपळे गुरव येथे राहणाऱ्या जयकुमार भुजबळ यांना ९ एप्रिलला धक्काच बसला. ९ एप्रिल रोजी सकाळी जयकुमार भुजबळ यांच्या कारवर अज्ञातांनी एक बॉक्स ठेवला. त्यावर जयकुमार यांचे नाव होते. जयकुमार यांचे वडिल मधुकर भुजबळ यांनी ती भेटवस्तू बघितली. त्यांनी तो बॉक्स उघडून बघितला असता त्यावर रक्ताचे डाग असलेले कोंबडीचं मुंडकं आणि पत्त्यांमधील जोकर होता. दुसऱ्या दिवशी जयकुमार यांचा वाढदिवस होता. त्या दिवशीही कारवर पत्ते टाकण्यात आले होते. दोन दिवसांनी कारवर काळा रंग देखील टाकण्यात आला. यात जयकुमार भुजबळ यांना धमकी देखील देण्यात आली होती. ‘याचा शेवट आता लाल रंगात होईल’, अशी धमकी देण्यात आली होती. या सर्व प्रकरणामुळे भुजबळ कुटुंबीय हादरुन गेले आहे. भुजबळ कुटुंबीय आता घराबाहेर पडायलाही घाबरत आहे. हा सगळा प्रकार इथेच थांबलेला नाही. मधुकर भुजबळ यांच्या नावाने फेसबुकवर फेक प्रोफाईल तयार करण्यात आले असून या अकाऊंटवरुन विचित्र मेसेज पाठवले जात आहेत. तर इन्स्टाग्रामवरही व्हाय सो सिरीयस आणि just before the dawn या नावाने अकाऊंट सुरु करण्यात आले आहे. या अकाऊंटवर भुजबळ यांच्या कारचे फोटो तसेच काही अश्लील फोटोही टाकण्यात आले आहेत. या सर्व प्रकाराने भुजबळ कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला असून त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.