21 January 2018

News Flash

काँग्रेस कमजोर होतेय-नायडू

भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित प्रभाग क्रमांक २१ घोरपडी येथे आयोजित सभेत नायडू बोलत होते.

प्रतिनिधी, पुणे | Updated: February 20, 2017 5:15 PM

केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांच्या जाहीर सभेचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते.

काँग्रेसच्या कार्यकाळात देशात गरिबी वाढली, घोटाळे झाले. त्यामुळे त्यांना आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे. जुनी आणि सध्याची काँग्रेस यामध्ये मोठा फरक आहे. सध्या अनेकजण काँग्रेसला सोडून जात आहेत. त्यामुळे पक्ष कमजोर होत आहे. देशातील प्रत्येक राजकीय पक्षाचे विघटन होत असताना भारतीय जनता पक्षाबाबत मात्र ही स्थिती नाही. भाजप विस्तारत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी गुरुवारी येथे केले.

भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित प्रभाग क्रमांक २१ घोरपडी येथे आयोजित सभेत नायडू बोलत होते. खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची यावेळी उपस्थिती होती.

नायडू म्हणाले की, केंद्र आणि राज्यातील विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेत पक्षाचे बहुमत असणे आवश्यक आहे. तरच योजनांना मूर्त स्वरूप येणार आहे. मेट्रो, स्मार्ट सिटी, नदी सुधार योजना, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि अन्य प्रश्नांसाठी अनेक योजना सरकारने आणल्या आहेत. भाजपची सत्ता असेल तर विकासाला चालना मिळणार आहे. खासदार शिरोळे, काकडे यांचीही भाषणे झाली. राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी प्रास्ताविक केले.

निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या वेंकय्या नायडू यांनी भाषणात अधून-मधून तेलुगू भाषेतून मतदारांशी संवाद साधला. त्यांच्या या भाषणाला उपस्थितांकडून चांगली दाद मिळाली.

First Published on February 17, 2017 2:22 am

Web Title: pmc elections 2017 venkaiah naidu
  1. No Comments.