येवलेवाडी येथे पुणे महापालिकेच्या निधीतून पाच कोटी रुपयांची विकासकामे केली जाणार असून त्याचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसने खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते परस्पर उरकल्याचा वाद पालिका सर्वसाधारण सभेत सोमवारी चांगलाच गाजला. या वादात सुरुवातीला आक्रमक असलेल्या राष्ट्रवादीला अखेर शिवसेनेपुढे नमते घ्यावे लागले आणि श्रेय लाटण्यासाठी राष्ट्रवादीने केलेली चूकही त्यामुळे अधोरेखित झाली.
शिवसेनेचे गटनेता अशोक हरणावळ यांनी सभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. येवलेवाडीतील विविध विकासकामांसाठी महापालिकेचा निधी वापरला जाणार असताना कामांचे भूमिपूजन राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात परस्पर का करण्यात आले, अशी विचारणा या वेळी हरणावळ यांनी केली. या कार्यक्रमासाठी कोणताही ठराव करण्यात आला नाही, स्थानिक आमदार, जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती सदस्य, त्या परिसरातील नगरसेवक यापैकी कोणालाही कल्पना देण्यात आली नाही. खासदार सुळे यांच्या हस्ते कार्यक्रम घडवून आणला गेला. हे चुकीचे आहे. जर महापालिकेचा निधी असेल, तर कार्यक्रम महापालिकेचा का नाही, असे प्रश्न हरणावळ यांनी या वेळी विचारले.
त्यावर बाबूराव चांदेरे त्यानंतर प्रशांत जगताप आणि त्यानंतर विशाल तांबे यांनी राष्ट्रवादीची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा खुलासा कोणालाही पटला नाही. शिवसेनेचे विजय देशमुख, संजय भोसले, मनसेचे वसंत मोरे, बाबू वागसकर यांनीही अनेक प्रश्न उपस्थित करत या कार्यक्रमाला पक्षाच्या कार्यक्रमाचे स्वरूप का दिले गेले, सर्व पक्षांना विश्वासात घेऊन कार्यक्रम का ठरवला नाही, इतर पक्षांना डावलून कार्यक्रम परस्पर का उरकला, अशी विचारणा केली. शिवसेनेने अनेक हरकती नोंदवत आणि प्रश्न उपस्थित करत या वेळी राष्ट्रवादीची चांगलीच अडचण केली.
येवलेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा जो कार्यक्रम पार पडला, त्यात महापालिकेचे काही अधिकारी उपस्थित होते. जे त्या कार्यक्रमात उपस्थित होते त्यांना त्याबाबत खुलासा करायला सांगा, असा आग्रह महापालिका सभेत मनसेचे बाबू वागसकर यांनी सातत्याने धरला. मात्र, त्याबाबत खुलासा झाला नाही.
येवलेवाडीतील विकासकामे आमदार वा खासदार निधीतून होत नसून ती पुणे महापालिकेच्या निधीतून होत आहेत हे लक्षात ठेवा. तुमची मनमानी चालू देणार नाही, असेही हरणावळ यांनी या वेळी राष्ट्रवादीला बजावले. शिवसेनेच्या या आक्रमक भूमिकेच्या प्रत्युत्तरादाखल राष्ट्रवादीकडे कोणतेही उत्तर नव्हते. त्यामुळे सभागृहात शांतता निर्माण झाली. अखेर या वादात राष्ट्रवादीला नमते घ्यावे लागले. राष्ट्रवादीचे चेतन तुपे म्हणाले, की शिवसेनेच्या भावनांची दखल प्रशासनाने घ्यावी. त्यांच्या भावना तीव्र आहेत. यापुढे अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करताना सर्वाना विश्वासात घेतले जावे.