पिंपरी-चिंचवड पहिले पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना पहिले पोलीस आयुक्त होण्याचा मान मिळाला. मात्र, त्यांची सेवानिवृत्ती काही दिवसांवर राहिलेली असताना त्यांची बदली करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पोलीस दलात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी संदीप बिष्णोई यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत.

१५ ऑगस्ट २०१८ ला पिंपरी-चिंचवड हे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाले. यात पिंपरी-चिंचवड चा शहरी आणि पुणे ग्रामीण भाग समाविष्ट करण्यात आला. पहिले पोलीस आयुक्त म्हणून आर.के.पद्मनाभन यांनी सूत्रे हातात घेतली. शहरातील ऑटो क्लस्टर मध्ये तात्पुरत्या स्वरूपात पोलीस आयुक्तालयाचा कारभार सुरू करण्यात आला, पहिल्याच काही दिवसात हिंजवडीची वाहतूक कोंडीचा जटील प्रश्न सोडवल्यानंतर शहरातील नागरिकांना पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या.

मात्र, प्रत्येक्षात नागरिकांचा भ्रमनिरास झाला. शहरातील खून, दरोडा, चोरी, अश्या प्रकारचे गुन्हे रोखण्यात ते अपयशी ठरले आहेत. त्यांच्या कार्यकाळात गुन्ह्यांची संख्या वाढली, पोलीस दलात गटबाजी पाहण्यास मिळाली. त्यामुळे अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी त्यांच्यावर नाराज होते. त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले मात्र ते ही फोल ठरल्याची चर्चा पोलीस दलात आहे. अशात ऐन विधानसभेच्या तोंडावर आणि काही दिवसात सेवानिवृत्त होणारे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांची बदली करण्यात आली असून तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. दरम्यान, संदीप बिष्णोई यांची नियुक्ती पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी करण्यात आली आहे. ते आपल्या कामाचा ठसा कसा उमटवतात हे पाहावं लागेल.