दूर अंतराची प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसचालकांकडून नियम मोडले जात नाहीत, असे नाही. मात्र, महामार्गावरील वाहतूक पोलिसांकडून नियम मोडणाऱ्या चालकांवर कारवाई होत नाही, त्याऐवजी इतर बसचालकांनाच किरकोळ कारणावरून लक्ष्य केले जात आहे. याबाबत पुण्यातील ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ कार्यकर्ते विलास लेले यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली आहे.
अशा प्रकारच्या कारवाया पुण्याच्या सर्व बाजूंनी असलेल्या महामार्गासह सर्वत्र सुरू आहेत. याबाबत लेले यांनी त्यांना नुकताच आलेला अनुभव पोलीस महासंचालकांना पाठविलेल्या निवेदनात दिला आहे. ते गेल्याच आठवडय़ात अंबोली घाटातून सावंतवाडी येथे खासगी प्रवासी बसमधून गेले होते. त्या वेळी तेथील वाहतूक पोलिसांनी त्यांची बस अडवली. त्यांनी चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना, प्रवासी बसचा बॅच आणि बसच्या सर्व कागदपत्रांची विचारणा केली. या सर्व गोष्टी बसचालकाकडे होत्या. त्याने त्या दाखवल्यावर पोलिसांनी ‘तू बॅच शर्टवर न लावता तो खिशात का ठेवलास’ अशी विचारणा केली आणि दंड भरण्यास सांगितले. तो भरला नाही तर वाहन चालवण्याचा परवाना जप्त केला जाईल, मग तो न्यायालयातून माघारी मिळवावा लागेल, असे सांगितले. या वेळी लेले यांनी हस्तक्षेप केला. त्या पोलिसांना, असा त्रास न देण्याची विनंती केली. मात्र, पोलिसांनी त्यांची दखल घेतली नाही. त्यांच्याकडे त्यांच्या वरिष्ठांबाबत चौकशी केली आणि दंडाची पावती फाडण्याचा अधिकार आपणाला कोणी दिला, असे विचारले. त्यावर या पोलिसांनी माघार घेतली आणि बसचालकाचा वाहन चालवण्याचा परवाना परत केला.
निवेदनात हा प्रसंग मांडून लेले यांनी असेही म्हटले आहे की, अनेक खासगी प्रवासी बसच्या टपावरून मोठय़ा प्रमाणात सामानाची वाहतूक केली जाते. अशा नियम मोडणाऱ्या खासगी बसेसवर कारवाई केली जात नाही. मात्र बहुतांश नियम पाळणाऱ्या बसलाच पोलिसांकडून लक्ष्य केले जाते. हा प्रकार त्वरित थांबावा, अशी मागणीही लेले यांनी पत्राद्वारे केली आहे. अशा प्रकारच्या कारवाया करण्याच्या नावाखाली भ्रष्टाचार वाढतो आणि प्रवास करणाऱ्या लोकांचा वेळ जातो आणि त्यांना त्रासही सहन करावा लागतो. या प्रकाराकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.