डॉक्टरांच्या चिठ्ठीच्या अन्न व औषध प्रशासनाने निश्चित केलेल्या मसुद्यानुसार चिठ्ठी छापून देणारी एक संगणकप्रणाली बाजारात आली आहे. ‘मेडिविंड ई-प्रिस्क्रायबर’ असे या प्रणालीचे नाव असून सोमवारी या संगणकप्रणालीचे उद्घाटन करण्यात आले.  
अन्न व औषध प्रशासनाने डॉक्टरांना आौषधांची चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) लिहिण्याच्या पद्धतीबद्दल दिलेल्या सूचना मंगळवारपासून (१ एप्रिल) लागू होणार आहेत. प्रशासनाने दिलेल्या चिठ्ठीच्या मसुद्यानुसार त्यात डॉक्टरांचे नाव, नोंदणी क्रमांक, रुग्णाचे नाव, पत्ता, तारीख, लिंग, वय, वजन या सर्व गोष्टींची नोंद करणे आवश्यक आहे. तसेच औषधांची नावे ‘कॅपिटल’ अक्षरांमध्ये लिहिणेही बंधनकारक करण्यात आले आहे. रुग्णांना जेनेरिक औषधे घेता यावीत यासाठी औषधांच्या जेनेरिक घटकांची नोंदही चिठ्ठीत करावी लागणार आहे.
मेडिमेज सिस्टिम्सचे डॉ. राजीव जोशी म्हणाले, ‘‘प्रत्येक वेळी रुग्णाचे नाव, पत्ता चिठ्ठीत लिहिणे टाळण्यासाठी ही माहिती एकदाच भरून ती पुन:पुन्हा छापली जाऊ शकेल. औषधांच्या ‘ब्रँड’ची नावे डॉक्टरांच्या लक्षात राहतात परंतु त्यातील जेनेरिक घटकांची नावे लक्षात ठेवणे त्रासदायक ठरते. यावर उपाय म्हणून या प्रणालीत औषधाचे ब्रँड नेम निवडले की त्याची जेनेरिक नावे आपोआप छापली जातील. तसेच औषधाचे नाव आपोआप कॅपिटल अक्षरांत छापून येण्याची सोयही प्रणालीत उपलब्ध आहे.’’
ही संगणकप्रणाली सशुल्क असून त्याविषयीच्या माहितीसाठी http://www.mediwind.com या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे डॉ. जोशी यांनी कळवले आहे.