इंटरनेटवरील एकाच संकेतस्थळावर वेगवेगळ्या ‘यूझर’च्या गरजा ओळखून त्यांना वेगवेगळ्या जाहिराती दिसतील अशी व्यवस्था करण्याचा व्यवसाय जागतिक पातळीवर चांगलाच बहरतो आहे. हा व्यवसाय वर्षांला ५० टक्के या दराने वाढत आहे. जाहिरात प्रदर्शनाची ही सेवा पुरवणाऱ्या ‘पबमॅटिक’ कंपनीच्या पुण्यातील नवीन कार्यालयाचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. या वेळी कंपनीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी राजीव गोयल यांनी ही माहिती दिली.
कंपनीच्या शहरातील कार्यालयात १०० जणांची भरती होणार असून त्यातील ८० जण तांत्रिक कामे बजावतील. पुढील वर्षभरात या कार्यालयाचा विस्तार करण्यात येणार असल्याचे कंपनीने पत्रकार परिषदेत सांगितले. कंपनीचे सहसंस्थापक मुकुल कुमार या वेळी उपस्थित होते.
गोयल म्हणाले, ‘‘डिजिटल प्रसारमाध्यमे वापरणाऱ्या यूझरच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यांच्याशी मिळतीजुळती जाहिरात केवळ त्या यूझरपुरती दाखवता येते. यूझर जितके क्षण त्या संकेतस्थळावर राहतो तेवढाच वेळ ती जाहिरात दिसत राहते. संकेतस्थळे आपल्याकडे असलेली जाहिरातींची जागा कंपनीकडे पाठवतात. ही जागा जाहिरातदारांपर्यंत पोहोचवून त्यासाठी लिलाव प्रक्रिया घडवून आणली जाते. लिलाव जिंकणाऱ्या जाहिरातदाराची जाहिरात विशिष्ट यूझरला विशिष्ट कालावधीपुरती दाखवली जाते. कंपनीतर्फे या प्रकारचे ६० अब्ज लिलाव दिवसाला केले जात असून कंपनीचे ७० टक्के ग्राहक अमेरिकेतील तर केवळ १ टक्का भारतातील आहेत. असे असले तरी भारतातील व्यवसायात भविष्यात अधिक वाढ होण्याची अपेक्षा आहे.’’
संकेतस्थळ वापरणाऱ्यांच्या ‘ब्राऊझिंग हिस्टरी’वरून तसेच ‘फेसबुक’सारख्या सोशल माध्यमांवरील त्यांच्या ‘प्रोफाईल’वरून कोणासाठी कोणती जाहिरात दाखवावी हे ठरवले जात असल्याचे गोयल यांनी सांगितले.
टीव्ही वाहिन्यांवरही प्रत्येक प्रेक्षकाला वेगळ्या जाहिराती दिसणार?
प्रत्येक वापरकर्त्यांची ‘ग्राहक’ म्हणून असलेली क्षमता हेरून त्याला विशिष्ट जाहिरात दाखवण्याचे हे लोण भविष्यात टीव्हीवरही येऊ शकेल. गोयल म्हणाले, ‘‘टीव्ही वाहिन्या अजूनही जाहिरात प्रदर्शनाबद्दल पारंपरिक पद्धतीनेच चालतात. मात्र प्रत्येक यूझरला वेगळी जाहिरात दाखवणे टीव्हीवरही शक्य होऊ शकते. प्रोग्रॅमॅटिक अ‍ॅडव्हरटायझिंगचे सर्वाधिक ग्राहक सध्या अमेरिकेतच असून तेथे टीव्ही पाहणाऱ्यांचा वयोगट प्रामुख्याने ६५ वर्षांच्या वरचा आहे. तिथली तरुणाई फारसा टीव्ही पाहात नाही. या काही गोष्टींचे अडसर या प्रक्रियेत आहेत.’’