करोनाचा संसर्ग, टाळेबंदीतही पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नात १० कोटी ७० लाख १३ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. यंदा कांदा, टोमॅटो, डाळिंबांचे दर घसरले होते. अशा परिस्थितीत बाजार समितीने आर्थिक वर्षांतील उत्पन्न वाढीची परंपरा कायम राखली आहे.

बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बाजार समितीच्या आर्थिक वर्षांतील कामगिरीचा आढावा सादर केला. ते म्हणाले, बाजार शुल्क, देखभाल दुरुस्तीतून मिळणारे शुल्क तसेच ठेवींवरील व्याज असे बाजार समितीचे मुख्य आर्थिक स्रोत आहेत. मार्केट यार्डातील व्यापार वाढत आहे. करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर बाजार बंद होता. अशा परिस्थितीत बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ झाली. बाजार समितीच्या ठेवी वाढल्या आहेत. त्यामुळे बाजार समितीला उत्पन्न कायम राखण्यात यश आले आहे.

२०१८-१९ मध्ये बाजार शुल्कातून ४३ कोटी ७९ लाख ८१ हजार ४१० रुपये उत्पन्न मिळाले होते. २०१९-२० मध्ये बाजार शुल्कातून ५१ कोटी ४६ लाख ६० हजार ५५३ रुपये उत्पन्न मिळाले आहे. बाजार शुल्कातून ७ कोटी ६६ लाख ७१ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. देखभाल दुरुस्ती शुल्क, ठेवींवरील व्याजात ३ कोटी ३४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. २०१८-१९ मध्ये  बाजार समितीचे एकूण उत्पन्न ६३ कोटी ६९ लाख ६१ हजार रुपये एवढे होते. २०१९-२० मध्ये त्यात वाढ होऊन एकूण उत्पन्न ७४ कोटी ३९ लाख ७४ हजार एवढे झाले आहे. २०१८-१९ मध्ये ४० कोटी ४३ लाख ५५ हजार महसुली खर्च होता. २०१९-२० मध्ये ५० कोटी ६० लाख ६६ हजार रुपये महसुली खर्च झाला आहे. महसुली खर्चात १० कोटी १७ लाख १० हजारांची वाढ झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.

२०१८-१९ मध्ये बाजार विकास निधी २३ कोटी २६ लाख ५ हजार रुपये होता. २०१९-२० मध्ये महसुली खर्च २३ कोटी ७९ लाख ८ हजार झाला आहे. २०१८-१९ मध्ये बाजार समितीकडे १९८ कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. यंदाच्या वर्षी ठेवींमध्ये ३ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पावणेदोनशे कोटींची मालमत्ता ताब्यात

बाजार समितीच्या प्रशासकपदाचा पदभार स्वीकारल्यापासून मोशी येथील ८ एकर जागा,  खेडशिवापूर येथील ५ एकर जागा, उत्तमनगर येथील ३ एक र जागा परत मिळवण्यात यश आले. मार्केट यार्डातील मॅफकोची ७८ गुंठे जमीन न्यायालयीन आणि शासन स्तरावर पाठपुरावा करून पुन्हा बाजार समितीला मिळवून देण्यात यश आले. बाजार समितीने ताब्यात घेतलेल्या जागांचे बाजार मूल्य पावणेदोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. बाजार समितीने कोणत्याही संस्थेकडून कर्ज घेतलेले नाही.