भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यास पक्षांतर बंदी कायद्यानुसार निवडणूक लढविण्यास अपात्र ठरण्याच्या भीतीपोटी नगरसेवकांचे छुप्या पद्धतीने भाजप प्रवेश सुरू असून काँग्रेसच्या नगरसेविका सुनीता गलांडे यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र प्रवेशानंतर प्रभागातील विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट होती, अशी सारवासारव केली.
भाजपमध्ये प्रवेश करायाचा आणि नंतर प्रवेश केला नाही, असे जाहीर करायचे असा प्रकार सुरू झाला असून तीच पद्धत काँग्रेसच्या नगरसेविका सुनीता गलांडे यांनीही कामय ठेवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, आमदार जगदीश मुळीक, नगरसेवक योगेश मुळीक यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा मुंबईत प्रवेश झाला. त्याची चर्चा सुरू होताच प्रवेशाचा हा कार्यक्रमच नव्हता. परिसरातील पाणीपुरवठय़ाच्या समस्येबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आली. प्रस्तावित भामा-आसखेड प्रकल्प पूर्ण झाल्यास या भागातील पाण्याची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक या प्रश्नात लक्ष घालावे, अशी विनंती केल्याची सारवासारव गलांडे यांच्याकडून सुरू झाली. खासदार संजय काकडे यांच्या पुढाकारातून काँग्रेसच्या नगरसेविका सुनंदा गडाळे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र काँग्रेस गटनेत्यांनी गडाळे यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली होती. तसेच पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र का ठरविण्यात येऊ नये, अशी विचारणाही केल्यावर त्यांनी पक्षातच असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळेच गलांडे यांनीही हीच काळजी घेतली. पालिका निवडणुकीसाठी भाजपला अनुरूप प्रभाग रचना व वातावरण लक्षात घेऊन अन्य नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रवेशास सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादी नगरसेविकेच्या कार्यालयाची तोडफोड
पिंपरी- राष्ट्रवादी काँग्रेसच्या आकुर्डी येथील नगरसेविका वैशाली काळभोर यांच्या काळभोरनगर येथील कार्यालयाची १२ ते १५ जणांच्या टोळक्याने तोडफोड केली. सकाळी दहाच्या सुमारास दुचाकीवरून १२ ते १५ जणांचे टोळके आले व त्यांनी हॉकी स्टीक, लोखंडी रॉड, स्टम्पच्या साहाय्याने कार्यालयाची मोडतोड केली. या वेळी तेथील अश्विनी पोळ यांनी रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी पोळ यांनाच धक्काबुक्की केली. कार्यालयाच्या काचा आणि खुच्र्याची तोडफोड करून ते निघून गेले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. राजकीय वादातून अथवा पूर्ववैमनस्यातून हा प्रकार झाला का, यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 14, 2016 3:10 am