भारतीय जनता पक्षात सुरू झालेली अन्य पक्षातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची ‘आवक’ पक्षातील निष्ठावंतांसाठी धक्कादायक ठरत असून या प्रक्रियेत मुख्य भूमिका बजावत असलेल्या खासदार संजय काकडे यांच्या ‘सक्रियते’मुळेही अनेकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. इतर पक्षीय आधी भाजपमध्ये प्रवेश घेतात आणि नंतर भारतीय जनता पक्षाला त्याची माहिती समजते, अशी सध्याच्या पक्षाची अवस्था आहे.

महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागताच भाजपमध्ये इतर पक्षातील नगरसेवकांचे व पदाधिकाऱ्यांचे आगमन मोठय़ा संख्यने सुरू झाले आहे. आलेल्यांपैकी एक-दोन प्रवेशाचे अपवाद वगळता इतर सर्वाचे पक्षप्रवेश खासदार काकडे यांनी घडवून आणले आहेत. पक्षप्रवेशाचे पाच कार्यक्रम आतापर्यंत मुंबईत वर्षां बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेही या वेळी उपस्थित होते. खासदार काकडे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचे तीन कार्यक्रम झाले. त्यातील एका कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश बापट यांचीही उपस्थिती होती. मात्र हे प्रवेश झाल्यानंतर व्हॉटस् अ‍ॅपच्या माध्यमातून संबंधित कार्यक्रमाची छायाचित्रे व माहिती पसरली आणि नंतर पुण्यात पक्षात ही माहिती समजली. या सर्वच प्रवेशाच्या प्रक्रियेत खासदार काकडे यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. हेही सर्वश्रुत आहे.

विशेष म्हणजे आणखीही अनेक नगरसेवक, तसेच अन्य पक्षांचे पदाधिकारी भाजपमध्ये येणार असल्याचे सांगितले जात असून त्यांच्या नावांची चर्चाही उघडपणे सुरू आहे. मात्र त्याची नेमकी माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांना नाही. ज्यांचे प्रवेश पक्षात होत आहेत त्यांची नावे जाहीर झाल्यानंतर ‘हो तो येणारच होता’ असे सांगून पक्षाकडून या पक्षप्रवेशाचे तोंडदेखले समर्थन केले जात असले तरी पक्षात मोठी अस्वस्थता आहे.

भाजपमध्ये जे प्रवेश आतापर्यंत झाले, त्यात मुख्यत: कसबा, पर्वती आणि कोथरुड या तीन विधानसभा मतदारसंघांमधील इतर पक्षातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या तीन मतदारसंघात भाजपची चांगली ताकद असून तेथूनच भाजपचे अधिक नगरसेवक निवडून येतात. त्यामुळे या तीन मतदारसंघांमधील भाजप इच्छुकांची संख्याही मोठी आहे. अशा परिस्थितीत इतर पक्षातील जे नगरसेवक व पदाधिकारी भाजपमध्ये घेतले जात आहेत, त्यांच्यामुळे पक्षात चांगलीच अस्वस्थता आहे. अनेक वर्षे पक्षात काम करत असलेल्यांवर अन्याय करून शेवटच्या क्षणी जे पक्षात येत आहेत, त्यांना उमेदवारी दिली जाणार का, असा प्रश्न सर्वासमोर असला तरी निवडणूक असल्यामुळे पक्षात ही चर्चा दबक्या आवाजातच सुरू आहे.

तीन मतदारसंघात भाजपची ताकद

भाजपमध्ये जे प्रवेश आतापर्यंत झाले, त्यात मुख्यत: कसबा, पर्वती आणि कोथरुड या तीन विधानसभा मतदारसंघांमधील इतर पक्षातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या तीन मतदारसंघात भाजपची चांगली ताकद असून तेथूनच भाजपचे अधिक नगरसेवक निवडून येतात.