राजकारण आणि समाजकारणात गेली चारदशके सक्रिय असलेला कार्यकर्ता आणि उत्कृष्ट संसदपटू अशी 5shivtareख्याती असलेले गिरीश बापट, तसेच ‘अभ्यासू आमदार’ म्हणून ओळख असलेल्या विजय शिवतारे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे पुणे शहर व जिल्ह्य़ाला आता तीन मंत्रिपदे मिळाली आहेत. पर्वतीचे आमदार दिलीप कांबळे यापूर्वीच राज्यमंत्री झाले असून कॅबिनेट दर्जामुळे पुण्याचे पालकमंत्रीपदही बापट यांच्याकडेच येण्याची शक्यता आहे.
सलग पाचव्यांदा आमदार झालेले बापट या वेळी कॅबिनेटमंत्री होणार हे निश्चित होते. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून बापट यांचे कार्य पुण्यात सुरू झाले. त्यानंतर ते जनसंघ आणि नंतर भाजपमध्ये सक्रिय झाले. महापालिकेत १९८३ मध्ये ते पहिल्यांदा निवडून आले. स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी १९८६-८७ मध्ये काम केले होते. जनसंघाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष, भाजपचे शहराध्यक्ष, संपदा सहकारी बँकेचे संचालक, कृष्णा खोरे मंडळ तसेच एसटीचे संचालक, भाजपचे प्रतोद आणि लोकलेखा समितीचे अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषविली आहेत.
सर्वसामान्य पुणेकरांच्या प्रश्नांची उत्तम जाण आणि माहिती असलेला नेता, अशी बापट यांची ओळख आहे. कार्यकर्त्यांमध्ये आणि पक्षात ‘भाऊ’ या नावाने ते परिचित आहेत. उत्तम संसदपटू म्हणूनही त्यांचा सन्मान झाला आहे. मतदार आणि कार्यकर्त्यांच्या सतत संपर्कात राहणाऱ्या बापट यांनी त्यांच्या कसब्यातील कार्यालयाचीही उत्तम घडी बसवल्यामुळे नागरिकांचे ते हक्काचे ठिकाण बनले आहे. कॅबिनेटमंत्री पदामुळे बापट यांना पालकमंत्रीपद मिळण्याचीही शक्यता आहे आणि त्यामुळे पीएमआरडीएचे अध्यक्षपदही त्यांनाच मिळण्याची शक्यता आहे.
शिवसेनेकडून शिवतारे यांना संधी
पुरंदर मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आलेले विजय शिवतारे उच्च शिक्षित असून अभ्यासू व प्रभावी वक्तृत्वासाठी त्यांची ओळख आहे. कृषी विषयाचाही त्यांचा चांगला अभ्यास आहे. राजकीय क्षेत्रात प्रथम ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सक्रिय होते. पुढे २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या आधी ते शिवसेनेत गेले आणि पदार्पणातच आमदार झाले. उत्तम संघटन आणि मतदारसंघातील विकासकामांच्या जोरावर मतदारांनी या वेळी त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवले आहे.

‘मावळ’ला फटका, भेगडे यांची संधी हुकली 5bhegade
राज्यमंत्रिमंडळात शिवसेनेच्या सहभागाचा ‘मावळ’ला फटका बसला आहे. मावळ विधानसभेचे आमदार बाळा भेगडे यांची मंत्रीमंडळात वर्णी लागेल, असा विश्वास भाजप वर्तुळात व्यक्त करण्यात येत होता. मात्र शिवसेनेचा मंत्रीमंडळात समावेश झाला आणि भाजपच्या मंत्र्यांची संख्या कमी झाली. त्यामुळे भेगडे यांची संधी हुकली. सलग पाच वेळा भाजपचा आमदार मावळातून निवडून आला आहे, तर भेगडे सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. ग्रामीण भागाला तसेच तरूण चेहऱ्याला संधी म्हणून भेगडे यांना मंत्रिपद मिळेल, असे भाजप वर्तुळात मानले जात होते. स्वत: भेगडे यांनीही तसे सूतोवाच पिंपरी पत्रकारसंघाच्या कार्यक्रमात केले होते.