पुणे विभागाची कामगिरी; विनाअडथळा वाहतूक

पुणे : टाळेबंदीमुळे विशेष गाडय़ा वगळता इतर सर्व प्रवासी गाडय़ा बंद असल्याच्या कालावधीत रेल्वेकडून मालवाहतुकीला प्राधान्य देण्यात येत आहे. त्या अंतर्गत मालगाडय़ांच्या वाहतुकीवर भर देण्यात येत असून, पुणे विभागाच्या कार्यक्षेत्रातून ४ सप्टेंबरला एकाच दिवशी ७५ मालगाडय़ांची विक्रमी वाहतूक झाली. विशेष म्हणजे या विभागातून दोनच दिवसांपूर्वी ७० मालगाडय़ा धावल्या होत्या.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीच्या काळात रेल्वेतून प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यानंतर मागणीनुसार श्रमिक गाडय़ा आणि सध्या विशेष प्रवासी गाडय़ाच सोडण्यात येत आहेत. त्यामुळे बहुतांश प्रवासी गाडय़ा अद्यापही बंद आहेत. त्यामुळे रेल्वेचा आर्थिक डोलाराही विस्कळीत झाला आहे. तो सावरण्याच्या दृष्टीने आणि देशभरात विविध ठिकाणी आवश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी रेल्वेने मालगाडय़ांच्या वाहतुकीवर मोठा भर दिला आहे.

व्यवसाय वाढविण्याच्या उद्देशाने विभागवार स्वतंत्र पथकांची स्थापनाही केली आहे. परिणामी, रेल्वेच्या मालवाहतुकीत लक्षणीय वाढ नोंदविली जात आहे.

मालवाहतुकीबाबत मध्य रेल्वेने ऑगस्टमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय वाहतुकीतही पाऊल टाकले आहे. त्या अंतर्गत पुण्यातून थेट बांगलादेशमध्ये मोटारींची वाहतूक करण्यात आली. त्याचप्रमाणे नाशिक येथूनही बांगलादेशात कांदा पाठविण्यात आला. त्यामुळे वाहन क्षेत्रातील उद्योग आणि शेतकऱ्यांनाही वाहतुकीचा नवा पर्याय मिळाला.

मिरज, दौंड आणि लोणावळा या पुणे रेल्वेच्या सीमा आहेत. या सीमांच्या आत असलेल्या विभागातून देशभरातून धावत असलेल्या मालगाडय़ा आणि विभागातून सुटणाऱ्या गाडय़ांची विनाअडथळा वाहतूक करण्यास विभाग यशस्वी झाला आहे. त्यातूनच एका दिवसात तब्बल ७५ मालगाडय़ांची विभागातून वाहतूक होऊ शकली.

प्रवासी वाहतुकीतील बहुतांश गाडय़ा सध्या बंद असल्याने मालवाहतुकीसाठी लोहमार्ग उपलब्ध होतो आहे. त्याचा लाभ घेत रेल्वेकडून देशभरात अन्नधान्य, औषधे आदी जीवनावश्यक वस्तूंसह कोळसा, खते, तेल आदींची मोठय़ा प्रमाणावर वाहतूक होत आहे. पुणे विभागाच्या नियोजनातून २ सप्टेंबरला विभागामधून ७०, तर ४ सप्टेंबरला ७५ या विक्रमी संख्येने मालगाडय़ांची ये-जा झाली.

– मनोज झंवर, पुणे रेल्वे जनसंपर्क अधिकारी