गर्दी म्हटलं की बाबांचा दरबार अशी आपल्याकडे परिस्थिती आहे. मात्र आता या स्वंयघोषित बाबांचे कारनामे पाहूनच लोक कलेकडे वळतात. नावाच्या मागे किंवा पुढे राम लावून आरामात हरामाचे काम केले जाते आणि भक्त त्यांना डोक्यावर घेतात, हे दुर्दैव असल्याचे सांगत आता रामदेवबाबांनाही दडपण आले असेल, असा टोला प्रख्यात अभिनेते शेखर सुमन यांनी लगावला. २९ व्या पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

लोक बाबांकडे जातात हे तर अंधश्रद्धेचे लक्षण आहे. अंधश्रद्धेपेक्षा आपला आपल्यावर विश्वास असावा, असेही त्यांनी या वेळी म्हटले. तत्पूर्वी ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते पुणे फेस्टिव्हलचे औपचारिक उद्घाटन झाले. यावेळी महापौर मुक्ता टिळक, पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी आदी उपस्थित होते. यंदा शेखर सुमन, ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि आयटीतज्ज्ञ आनंद खांडेकर यांना ‘पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले.

‘खामोश, अब मेरी बारी है’ अशी सुरूवात करून शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, मी कोणत्याही बाबांची, कलाकारांची, शिवाजी महाराजांची भाषा बोलू शकत नाही. दोन माणसांमध्ये प्रेम असल्यावर भाषा ही भिंत कधीच राहू शकत नाही. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. मी पुण्याचा वफादार आहे. जन्म पाटण्यातील असला तरी मला पुण्याने घडविले आहे.

या वेळी नृत्यातून साकारलेले ईशस्तवन, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमासह महाराष्ट्राची महती उलगडणारा पोवाडा, मल्लखांब आणि योगाची चित्तथरारक प्रात्याक्षिके, मराठी सिनेतारकांसह ऊर्मिला मार्तोंडकरने लावणी सादर केली.