तक्रारदारांच्या सेवेसाठी नेमणूक; विधी सेवा प्राधिकरणाची योजना

पोलीस ठाण्यात  , तक्रारदार तसेच आरोपींना मार्गदर्शन करण्यासाठी पुणे जिल्हा सेवा विधी प्राधिकरणातर्फे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये निमविधी स्वयंसेवकांची (पॅरा लीगल)नेमणूक करण्याची योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत मार्गदर्शनासाठी ८० स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात येईल.

या नव्या योजनेची तयारी सुरू असून सध्या विधी अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थाचे कार्यकर्ते, सामाजिक कामामध्ये रुची असलेल्या नागरिकांना विधी सेवा प्राधिकरणाकडून प्रशिक्षण देण्यात येत आहे. पॅरा लीगल स्वयंसेवकांना ओळखपत्रही देण्यात आले आहे. पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांना न्यायालयीन प्रक्रियेची माहिती देणे, हा या उपक्रमामागचा प्रमुख उद्देश आहे. ज्येष्ठ विधिज्ञ, न्यायाधीश यांच्याकडून विविध कायदे, नागरिकांचे हक्क, अधिकार या बाबतची माहितीही स्वयंसेवकांना करून देण्यात आली आहे. या योजनेसंबंधीची माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. कोकरे यांनी दिली.

आठवडय़ातील दोन दिवस हे स्वयंसेवक त्यांची नियुक्ती केलेल्या पोलीस ठाण्यांमध्ये जाणार आहेत. स्वयंसेवकांच्या उपस्थितीसाठी पोलीस ठाण्यात रजिस्टर ठेवण्यात आले आहे. तक्रारदाराला कायदेविषयक माहिती देणे तसेच कायद्यांबाबत त्याच्यात सजगता निर्माण करणे यासाठीचे प्रयत्न स्वयंसेवकांकडून केले जाणार आहेत. अनेकादा पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्याला कायद्याची माहिती नसते. त्यामुळे पोलीस ठाण्यात चुकीच्या मुद्यांवर वाद घातले जातात. पोलीस ठाण्यात येणारे किरकोळ वाद सामोपचाराने मिटवले जाऊ शकतात. त्यासाठी हे स्वयंसेवक मार्गदर्शन करतील. तसेच तक्रारदाराला योग्य मार्गदर्शन मिळावे, त्याची फसवणूक होऊ नये, वाद सोडवताना तडजोड चुकीच्या मुद्यांवर होऊ नये, यासाठी देखील स्वयंसेवक काम करतील, असे कोकरे यांनी सांगितले. कौटुंबिक वाद, माराहाणीच्या घटना अशा प्रकरणांमध्ये हे स्वयंसेवक तक्रारदारांचे समुपदेश करतील. तसेच त्याला कायदेविषयक मार्गदर्शनही करतील.

स्वयंसेवकांचा मोबाइल क्रमांक उपलब्ध

पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांना कायदेविषयक मदत करण्याचा उपक्रम राबवण्यास काही पोलीस ठाण्यांमध्ये सुरुवात झाली आहे. त्यासाठी शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येकी दोन स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. आठवडय़ातील दोन दिवस स्वयंसेवक पोलीस ठाण्यांमध्ये जाऊन नागरिकांना मार्गदर्शन करतात. त्यांचे नाव, मोबाइल क्रमांक पोलीस ठाण्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

– आर. व्ही. कोकरे, सचिव, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण