राज्यात करोनाचा झपाट्याने होणारा संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार ५ एप्रिल रात्री ८ पासून दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी असणार आहे. तर, शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन असणार आहे. पुणे शहरातही दिवसेंदिवस बाधितांच्या संख्येत भर पडत असल्याने पुणेकरांच्या चिंतेत भर पडत आहे. अशातच उकाडा वाढल्यामुळे गरम होत असल्याने मास्क घालण्यास काहीजण टाळाटाळ करत असल्याचं समोर येत आहे. अशांसाठी पुणे पोलिसांनी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.

“खूप गरम होतंय…मास्क नाही घालू शकत, असे शब्द जर तुम्हीही वापरले असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे”, असं म्हणत पुणे पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अंध किंवा एक हात नसलेल्या दिव्यांग, अपंग व्यक्तीही मास्क घालताना दिसत आहेत. तसेच, जर आम्ही मास्क घालू शकतो तर तुम्ही नक्कीच मास्क घालू शकतात असा संदेश या प्रेरणादायी व्हिडिओतून ते देत आहेत. या खास व्हिडिओद्वारे पुणे पोलिसांनी सर्व नागरिकांना एकप्रकारे कोणतंही कारण न देता मास्क घालण्याचं आवाहन केलं आहे.

देशातील करोनाच्या रुग्णसंख्येने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले असून गेल्या २४ तासात देशात एक लाखांहून जास्त नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर, ४७८ जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहर जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची एकाच दिवसातील रुग्णसंख्येने पुन्हा उच्चांक गाठलाय. जिल्ह्यात रविवारी १२ हजार ४९४ जणांना संसर्ग झाला असून एकट्या पुण्यात निम्म्याने म्हणजेच सहा हजार २२५ जणांना संसर्ग झाल्याचे निदान झाले. जिल्ह्यात एकूण ६४ जणांचा मृत्यू झाला असून, शहरात ४१ हजार ९४० सक्रिय रुग्ण आहेत.