विकास कामांसाठी ५० कोटींच्या निधीस मंजुरी

प्रवासी सुविधेच्या दृष्टीने पुणे रेल्वे स्थानकावर सध्या काही कामे सुरू असली, तरी रेल्वे बोर्डाच्या योजनेअंतर्गत नव्या वर्षांमध्ये स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी ५० कोटी रुपयांच्या निधीलाही मंजुरी देण्यात आली असून, त्यामुळे स्थानकावरील विविध कामांना वेग येणार आहे.

प्रवाशांबरोबरच गाडय़ांची संख्या झपाटय़ाने वाढत असलेल्या पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या गरजेनुसार वेळोवेळी विविध सुविधांमध्ये भर टाकण्यात येत आहे. त्याचप्रमाणे स्थानकाच्या सुशोभिकरणावरही भर दिला जात आहे. स्थानकाच्या मुख्य इमारतीच्या दर्शनी भागाच्या सुशोभिकरणाचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. स्थानकातील सर्व फलाटांना जोडणारा एकच जुना पादचारी पूल असल्याने त्यावर येणारा ताण लक्षात घेता सध्या सर्व फलाटाला जोडणाऱ्या नव्या पादचारी पुलाचे काम सुरू आहे. स्थानकाच्या एका बाजूकडून राजा बहादूर मिल रस्त्यावरून जाणारा हा पूल येत्या काही दिवसांत कार्यरत होईल.

रेल्वे बोर्डाच्या योजनेनुसार देशभरातील ठरावीक रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यात पुणे रेल्वे स्थानकाचा समावेश असल्याने नव्या वर्षांत स्थानकाच्या पुनर्विकासाची आणखी कामे मार्गी लागू शकणार आहेत. पुणे रेल्वे स्थानकावर एकूण सात फलाट आहेत. त्यापैकी एक आणि सात क्रमांकाच्या फलाटावरच २६ डब्यांच्या मोठय़ा गाडय़ा उभ्या केल्या जाऊ शकतात. दोन आणि तीन क्रमांकाच्या फलाटावर २४ डब्यांच्या, चार आणि पाच क्रमांकाच्या फलाटावर २१ किंवा २२ डब्यांच्या, तर सहा क्रमांकाच्या फलाटावर १९ किंवा २० डब्यांच्या गाडय़ा उभ्या करणे शक्य होते. मात्र, सर्वच फलाटांवर २६ डब्यांच्या मोठय़ा गाडय़ा उभ्या करता याव्यात यासाठी फलाटांची लांबी वाढविण्यात येणार आहे. शिवाजीनगरच्या बाजूने हे फलाट वाढविण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले.

पुणे ते लोणावळा दरम्यान गाडय़ांचा वेग वाढवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि गाडय़ांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे कामही नव्या वर्षांत मार्गी लागू शकणार आहे. सध्या पुणे ते कामशेत दरम्यान हे काम पूर्ण झाले आहे. येत्या काही दिवसांत कामशेत ते लोणावळा या टप्प्यातील काम पूर्ण होणार आहे, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

रेल्वेच्या योजनेनुसार देशभरातील चारशे रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करून ती चकाचक करण्याचे नियोजन आहे. या महत्त्वाकांक्षी मोहिमेत पहिल्या टप्प्यामध्ये निवडण्यात आलेल्या ६३ रेल्वे स्थानकांचे काम २०१९ पर्यंत कोणत्याही स्थितीत करण्याचा निर्धार रेल्वे मंत्रालयाने केला आहे.

ही आहेत वैशिष्टय़े

  • नवीन पादचारी पूल लवकरच खुला होणार
  • स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे काम वर्षांत मार्गी लागणार
  • फलाटांची लांबी वाढविण्यात येणार