वेगावर नियंत्रण असणाऱ्या यंत्रणेचा अभाव; अपघातांचे प्रमाण अधिक

पुणे-सोलापूर महामार्गाचे चार वर्षांपूर्वी चौपदरीकरण झाल्यानंतर वाहतुकीचा वेग वाढला आहे. पुणे आणि सोलापूर या दोन शहरांदरम्यानचे अंतर कमी झाले असले तरी वेगामुळे या रस्त्यावर गंभीर स्वरूपाचे अपघात होत आहेत. महामार्गावर इंदापूर ते भिगवण दरम्यानचा रस्ता चढउताराचा असल्याने या भागात अपघातांचे प्रमाण जास्त आहे. मात्र या रस्त्यावर वाहनांच्या वेगाला वेसण घालण्यासाठी यंत्रणा नसल्याने गंभीर स्वरूपाच्या अपघातांचे प्रमाण वाढत आहे.

गेल्या आठवडाभरात पुणे-सोलापूर महामार्गावर गंभीर स्वरूपाचे दोन अपघात झाले. त्यापैकी एका अपघातात निगडीतील एकाच कु टुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला होता. सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातांमागे वाहनांचा निष्काळजीपणा तसेच भरधाव वेग कारणीभूत असल्याचे निरीक्षण पोलिसांकडून नोंदविण्यात आले आहे. उन्हाळय़ाच्या सुट्टीत अनेक जण सहकुटुंब देवदर्शन तसेच पर्यटनासाठी जातात. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत महामार्गावरील वाहतुकीत वाढ होते. उन्हाळय़ात चारचाकी वाहनांचे टायर तापतात.  इंदापूर ते भिगवण दरम्यानचे अंतर ४० ते ४५ किलोमीटर आहे. या भागात चढउतार आहेत. मोटार, जीप, जड वाहनांचा वेग प्रतितास शंभर किलोमीटरपेक्षा जास्त असतो. इंदापूर ते भिगवण दरम्यान गंभीर स्वरूपाचे अपघात होतात. या रस्त्यावरील काही भाग अपघात प्रवण आहेत.

वेगमर्यादा नसल्यामुळे वाहनचालक भरधाव वेगाने जातात. काही भागांत तीव्र उतार आहेत. उतारावर वाहनांचा वेग वाढतो आणि वाहनचालकांचे नियंत्रण सुटते. उन्हाळय़ात टायर तापल्याने प्रसरण पावतात. टायर फुटल्यानंतर वाहनचालकाचे नियंत्रण सुटते आणि समोरून येणाऱ्या वाहनांवर वाहन आदळते. त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर स्पीडगनच्या माध्यमातून कारवाई होणे गरजेचे आहे. या मार्गावर पोलिसांनी कारवाई केल्यास गंभीर स्वरूपाचे अपघातांचे प्रमाण कमी होईल.

डाळज ते पळसदेव मार्गावरील वाहतूक सेवा रस्त्याने

गेल्या आठवडय़ात पळसदेव भागात अपघात झाले. महामार्गावरील डाळज ते पळसदेव मार्गावर सध्या डागडुजीचे काम सुरू आहे. या भागातील रस्ता उखडलेला आहे, त्यामुळे डाळज ते पळसदेव या दहा किलोमीटरच्या अंतरावरील वाहतूक सेवा रस्त्याने वळविण्यात आली आहे. महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्याने वळविण्यात आल्यामुळे वाहतुकीचा ताण वाढलेला आहे. त्यामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात होण्याची शक्यता आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांकडून स्पीडगनद्वारे कारवाई करण्यात येते.  पुणे-सोलापूर महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या बाबत शासकीय अधिसूचना जारी झाल्यानंतर पुणे-सोलापूर महामार्गावर स्पीडगनद्वारे कारवाई करणे शक्य होईल.

अमोल तांबे, राज्य महामार्ग पोलीस विभाग, पोलीस अधीक्षक