दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित करीत आपल्या आई-वडिलांची मान अभिमानाने उंचावण्याची कामगिरी पुण्यातील एका टेम्पो चालकाच्या मुलीने केली आहे. प्रणिता आबासाहेब कारंडे असं दहावीत 95.80 गुण मिळवलेल्या मुलीचं नाव आहे. तिने दिवस-रात्र अभ्यास करून वडिलांच्या कष्टाचं चीज केलं आहे. तिला भविष्यात डॉक्टर व्हायचंय. इयत्ता दहावीत शिकत असताना आईने प्रणिताला घरातील कामं सांगितली नाहीत. या उलट त्यांनी तिला अनेकदा मदतच केली. घरात बहीण भाऊ आणि आई-वडील असून बहिणीनेही दहावीत प्राविण्य मिळवले होते.

प्रणिता आबासाहेब कारंडे हिच्या घरची परिस्थिती तशी नाजूकच. वडील आबासाहेब हे टेम्पो चालक असून 15 हजार रुपये महिन्याला मिळवतात. मिळणाऱ्या पैशातून घरातील पाच जणांचं कसंबसं भागतं, त्यात दोन मुलींचं आणि मुलाचं शिक्षणही. गेली कित्येक वर्ष मेहनतीच्या बळावर संसाराचा गाडा यशस्वीपणे ते हाकत आहेत. प्रणिताने कधीच कुठल्या गोष्टीसाठी हट्ट धरला नाही, तिच्या वडिलांनीही शिक्षणाच्या बाबतीत तिला काही कमी पडू दिलं नाही.  सकाळी साडेचारला उठणे आणि अभ्यास करणे तसेच विद्यालयात जाऊन पुन्हा घरी आल्यानंतर अभ्यास करणे असा तिचा दिनक्रम असायचा.

आई स्वाती यांचं सातवी तर वडील आबासाहेब यांचं दहावी पर्यंत शिक्षण झालेलं आहे. त्यामुळे ते दोघे ही शिक्षणाचं महत्त्व जाणतात. प्रणिताला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं असून नामवंत डॉक्टर व्हायचं आहे, असं प्रणिता म्हणाली. शिक्षणात आर्थिक अडचणी आल्या तरी मुलींनी शिकलं पाहिजे असं तिच्या आईचं म्हणणं आहे. वडिलांनी केलेल्या काबाडकष्टाचं चीज झालं असून पुढील आयुष्यात आणखी उंच भरारी प्रणिताला घ्यायची आहे.