|| अनिकेत साठे, लोकसत्ता

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत असणाऱ्या महाविद्यालयांत पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग राज्य शासनाच्या परवानगीविना ११ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे धाडस विद्यापीठाच्या अंगाशी आले आहे. उच्च शिक्षण विभागाने खरडपट्टी काढल्यानंतर या निर्णयास स्थगिती देण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढावली आहे.
करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने पदवी, पदव्युत्तर महाविद्यालयांत नियमित वर्ग सुरू करता येतील की नाही, याविषयी आढावा घेण्यासाठी विद्यापीठाने प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली होती. या समितीने पुणे, नाशिक, नगर जिल्ह्य़ांतील स्थितीचा आढावा घेतला. या समितीच्या अहवालाच्या आधारे विद्यापीठाने ११ जानेवारीपासून सर्व महाविद्यालयांत पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील अकृषी विद्यापीठे, संलग्नित महाविद्यालयात प्रत्यक्ष वर्ग सुरू करताना शासनाची मान्यता घेणे बंधनकारक आहे. परंतु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परिपत्रक जारी करत पदवी, पदव्युत्तरचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याचा निर्णय परस्पर घेतला. यावरून उच्च शिक्षण संचालकांनी विद्यापीठास फटकारले आहे. शासनाने कोणतेही आदेश दिले नसताना कोणत्या नियमाच्या आधारे हा निर्णय घेतला, याचा तात्काळ खुलासा मागितला आहे. यासंबंधीचे पत्र उच्च शिक्षण संचालनालयाने विद्यापीठास पाठविले आहे.

त्यानंतर विद्यापीठाने त्वरित महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयास स्थगिती दिली. महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्राचार्यानी महाविद्यालये सुरू करण्याची मागणी केल्याचे म्हटले गेले असले तरी अनेक प्राचार्याकडे या संदर्भात विचारणा केली नसल्याचे उघड झाले आहे. विद्यापीठाकडून एकामागोमाग येणाऱ्या परिपत्रकांमुळे गोंधळाची स्थिती आहे.

स्पष्टीकरण असे..

– उच्च शिक्षण विभागाने आक्षेप घेतलेला नाही. केवळ माहिती मागविली आहे. ती माहिती दिली जाईल. विद्यापीठाने गठित केलेल्या डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील समितीने स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन महविद्यालये हळूहळू सुरू करता येईल, असा कल व्यक्त केला. विद्यार्थी, प्राध्यापकांसह प्राचार्याची तशी मागणी असल्याचे निदर्शनास आणले. ११ जानेवारी रोजी सर्वच काही एकदम सुरू होणार नव्हते. प्रात्यक्षिक, प्रयोगशाळेतील कामे, संशोधनासंबंधी कामे, सादरीकरण असे हळूहळू सुरू करण्याचे नियोजन होते.

– विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी महाविद्यालयांना र्निजतुकीकरण, सुरक्षित अंतराचे पथ्य आणि पायाभूत सुविधांची उभारणी यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे.

– आपत्ती व्यवस्थापन कायदा, जिल्हाधिकारी आणि शासन यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर महाविद्यालये सुरू करण्याच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी स्पष्ट केले.