लेखक अस्वस्थ असला तरच त्याच्या हातून कसदार साहित्यनिर्मिती होते, असे मत ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केले.
नंदिनी पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रसिद्ध कवयित्री-लेखिका आश्लेषा महाजन यांच्या ‘एक पानी आरस्पानी भाग १ आणि भार २’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध लेखक शिवराज गोर्ले यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी गोडबोले बोलत होत्या. लेखक प्रा. मििलद जोशी आणि प्रकाशिका नंदिनी तांबोळी या वेळी उपस्थित होत्या.
गोडबोले म्हणाल्या, स्तंभलेखन हे लेखकांसाठी आव्हानच असते. लेखनामध्ये सातत्य आणि वैविध्य टिकविणे ही अवघड गोष्ट आहे. दैनंदिन आयुष्यातील गोष्टींवर भाष्य करणारे महाजन यांचे ललित लेखन कसदार आहे. अनेक लेखातून त्यांच्या कविमनाची प्रचिती येत असून हे लेखन सकारात्मक आणि आशावादी आहे.
सदरलेखन करताना लेखनाची गुणवत्ता टिकविणे ही कठीण गोष्ट असून महाजन यांनी हे कसब साधले असल्याचे शिवराज गोर्ले यांनी सांगितले. मििलद जोशी म्हणाले, महाजन यांचे छोटेखानी लेखन अंतर्मुख करणारे आहे. वृत्तपत्रातील लेखांचे पुस्तक झाल्याने हे माध्यमांतर वाचकांना आवडेल, अशी भावना आश्लेषा महाजन यांनी व्यक्त केली.