यवतजवळील खामगाव फाटा येथे झालेल्या रेल्वे अपघाताचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. अपघाताशी संबंधित तांत्रिक गोष्टींकडे पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून, त्यानुसार हा तपास करण्यात येत आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्व कागदपत्रे मागविण्यात आली आहेत. गेटमनने रेल्वेचे फाटक बंद न केल्यामुळे अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे.
दरम्यान, गेटमन जयपाल धर्मपालसिंग यादव (वय ३२) याला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ९ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
हैदराबादहून मुंबईकडे निघोल्या दुरांतो एक्स्प्रेसने शनिवारी सकाळी खामगाव फाटा येथे ट्रॅक्टरला ठोकरल्याने झालेल्या अपघातात तीन मजुरांचा मृत्यू झाला तर १९ जण जखमी झाले आहेत. रेल्वे येणार असतानाही गेटमने फाटक बंद न केल्यामुळे हा अपघात झाल्याचे स्पष्ट आहे. अपघात घडल्यानंतर यादव याला ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास दौंड पोलीस ठाण्याचे निरीक्षक साजन हंकारे हे करीत आहेत.
याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी सांगितले, की रेल्वे प्रशासनाकडून सर्व कागदपत्रे मागविण्यात आली आहेत. रेल्वे पोलिसांच्या मदतीने सर्व तांत्रिक गोष्टींचा तपास सुरू आहे.