पुणे महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गटनेतापदी राजेंद्र (बाबू) वागसकर यांची सोमवारी नियुक्ती करण्यात आली. तसे पत्र पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी वागसकर यांना दिले आहे. पक्षाच्या सर्व नगरसेवकांच्या मदतीने महापालिकेच्या विविध प्रकल्पांचा दरमहा आढावा घेऊन नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे वागसकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पक्षाचे नाव व ठसा महापालिकेत उमटवून जनतेचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य द्यावे, असे ठाकरे यांनी वागसकर यांना दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे. वागसकर या वेळी महापालिकेत दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. ते आणि पत्नी वनिता असे दोघे प्रभाग क्रमांक २१ मधून निवडून आले आहेत. दोघांनी प्रभागातील सार्वजनिक स्वच्छता आणि नागरिकांचा सहभाग या विषयात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे महापालिकेने यशवंतराव चव्हाण स्वच्छता अभियानात घेतलेल्या स्वच्छ प्रभाग स्पर्धेत वागसकर यांच्या प्रभागाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले मिळाले होते.
महापालिकेतर्फे शहरात विविध विकासकामे आणि प्रकल्पांची कामे सुरू आहेत. ही कामे व प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तसेच त्यांचा अभ्यास करण्यासाठी नगरसेवकांचे गट तयार करणार असून हे गट त्या त्या कामांचा अभ्यास करतील. सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून या कामांचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत, असे वागसकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.