दलित समाजातील तरुणांसाठी सैन्यदलात आणि त्याच्याशी संलग्न विभागांमध्ये नोकरीसाठी विशेष आरक्षण असावे, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केली. यासाठी संरक्षणमंत्र्यांशी लवकरच चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दलित तरुणांनी सैन्यात जावे, तिथे चांगले खायला प्यायला मिळते, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. दलित तरुणांच्या सैन्यातील संधींच्या विशेष आरक्षणासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

महागाई कमी होणार आणि ‘अच्छे दिन’ येणार अशी घोषणा सरकारने केली होती. मात्र, अातापर्यंत तसे काही होताना दिसले नाही. या प्रश्नावर आठवले म्हणाले, महागाई अजून कमी झाली नाही हे आम्हाला मान्य आहे. सरकारकडून ज्या घोषणा किंवा आश्वासने देण्यात आली आहेत, त्याची पूर्तता लगेच होणार नसून येत्या काळात त्याचे परिणाम दिसतील.

बुलेट ट्रेनला विविध राजकीय पक्षांकडून विरोध होताना दिसत आहे. याबाबत बोलताना राज ठाकरेंनाही त्यांनी टोमणा मारला. ते म्हणाले, बुलेट ट्रेन नको ही भूमिका चुकीची असून यापुढे विमान देखील नको अशी भूमिका कोणी मांडू शकतो.

नारायण राणेंच्या नव्या पक्ष स्थापनेविषयी विचारले असता आठवले म्हणाले, नारायण राणेंबाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोललो होतो. राणेंना भाजपमध्ये घ्या, नाहीतर मी रिपाइंमध्ये घेतो. मात्र, आता त्यांनी एक स्वतंत्र पक्ष स्थापन केला असून भविष्यात ते ‘एनडीए’चा घटक असतील आणि त्यांना सामावून देखील घेतले जाईल, अशी भूमिका आठवले यांनी यावेळी मांडली. राणे ‘एनडीए’मध्ये आल्यास शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार अशी चर्चा आहे. यावर उद्धव ठाकरे बाहेर पडले तरी सरकारला काही फरक पडत नाही, असे आठवले यांनी ठामपणे सांगितले.

मुंबई येथे दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेबाबत आठवले म्हणाले, ही घटना अतिशय वाईट आहे. याबाबत गांभीर्याने पावले उचलण्याची गरज असून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.