पुणे शहरातील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटनेला काही दिवस उलटत नाही, तोच आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्यानंतर बलात्काराची घटना समोर आली आहे.

हडपसर भागातच अल्पवयीन पीडित मुलगी कुटुबीयांसोबत राहते. तिची बिट्टू शेख या आरोपीशी ओळख होती. ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीनं पीडित मुलाला लॉजवर घेऊन जात बलात्कार केला. अत्याचार केल्यानंतर याची माहिती कुणाला दिल्यास वडिलांना ठार मारण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने कुणाकडेही घटनेची वाच्यता केली नाही. दरम्यान, तिच्या पोटात दुखू लागल्यानं कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केलं.

पीडितेनं रुग्णालयात एका मुलाला जन्म दिल्यानंतर बलात्काराची घटना समोर आली. लॉकडाउन आणि कौटुंबिक समस्यांमुळे पीडितेनं झालेल्या घटनेबद्दल कुणालाही माहिती दिली नाही. त्यामुळे तक्रार नोंदवण्यास उशीर झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१५ वर्षीय मुलीवर झाला केला सामूहिक अत्याचार

हडपसर येथील ससाणेनगर भागात राहणारी १५ वर्षीय तरुणी बाहेर जाऊन येते सांगत २६ ऑक्टोबर रोजी घराबाहेर पडली होती. मात्र बराच वेळ होऊनदेखील मुलगी घरी न आल्याने तिच्या आई-वडिलांनी आजूबाजूला शोध घेण्यास सुरुवात केली. २९ तारखेला तरुणी दुपारच्या सुमारास सासवड येथे सापडली. तरुणीने आपल्यावर चौघांनी बलात्कार केल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे हडपसर परिसरात मोठी खळबळ उडाली होती.