पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदूंना भारतामध्ये परतण्याची ओढ लागली असून, त्यांनी हिंदू महासभेकडे मदतीची याचना केली असल्याची माहिती अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. राकेश रंजन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. बांगलादेशातील काही मुसलमानांना शुद्धिकार्य करून हिंदू धर्मामध्ये घेण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
हिंदू महासभेतर्फे २०११ मध्ये पाकिस्तानातील १५१ निर्वासित हिंदूंना भारताचे नागरिकत्व मिळवून देण्यात आले असून त्यांचे पुनर्वसन करण्यामध्ये यश आले आहे. त्यानंतर तेथील हिंदूंनी अल्पसंख्याक हिंदू म्हणून आमची सतत छळवणूक होत असून आमचीही भारतामध्ये येण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती केली असल्याचे सांगून राकेश रंजन म्हणाले, कुंभमेळय़ासाठी आलेल्या तुर्कस्थानातील २५० मुसलमानांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला असून, काही नागरिकांनी आता भारतामध्येच राहण्याचा आग्रह धरला आहे. बांगलादेशातील अडीच हजार मुसलमानांपैकी काही जण हिंदू धर्मात परतले आहेत. या नागरिकांचा त्या देशात छळ होत असल्यामुळे त्यांना परत जाण्याची इच्छा नाही. या सर्वाना हिंदू महासभेतर्फे मूलभूत साहाय्य करण्यात येत आहे. याप्रसंगी पुणे नगर हिंदू महासभेचे अध्यक्ष प्रा. गजानन नेरकर आणि प्रवक्त्या हिमानी सावरकर उपस्थित होत्या.