‘सर्व परिवर्तनवादी व समतावादी चळवळी काही किमान मुद्दय़ांवर एकत्र आल्या व त्यांनी विषय तत्त्वांच्या विरोधात लढाई करायचे ठरवले तरी देशातील विषमतावाद्यांचा पराभव करणे सोपे नाही. मग हे जर फुटलेले व आपापसात लढणारे असतील तर ही लढाई किती अवघड होईल याचा विचार व्हावा, असे मत ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंके यांनी व्यक्त केले.
‘विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सम्यक साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंके यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. फुले पगडी व पंचवीस हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते. संमेलनाध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे, गुजराथी कवी हरीश मंगलम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, डॉ. पी. ए. इनामदार, ‘सुगावा’ प्रकाशनाचे प्रा. विलास वाघ, साहित्यिक अनिल सपकाळ, ‘बार्टी’चे पी. डी. गायकवाड, संमेलनाचे संयोजक पुरुषोत्तम वाडेकर, डॉ. कुमार अनिल या वेळी उपस्थित होते.
साळुंके म्हणाले, ‘आजच्या काळात अडचणी वाढताना दिसत असून संविधानाबाबत काळजी वाटावी असे प्रसंग व वक्तव्येही देशात घडू लागली आहेत. देशातील विषमता वाढण्याचा प्रचंड धोका निर्माण झाला आहे. अशा वेळी स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांवर श्रद्धा असणाऱ्यांची जबाबदारी काय याचे भान ठेवायला हवे. तंत्रज्ञान व आधुनिक गोष्टींमुळे आज शोषितांची लढाई अधिक कठीण व विषम झाली आहे.’
आठवलेंच्या कवितांवर कसबे बरसले!
रावसाहेब कसबे यांनी रामदास आठवले यांच्यावर नाव न घेता टीका केली. कसबे म्हणाले,‘प्रकाश आंबेडकर यांची मते पटो ना पटो, परंतु त्यांनी उत्तम संसदपटूसारखे भाषण केले याचे कौतुक वाटते. बाकीचे नेते कविता वाचत बसले. मान खाली घालावी लागली. मला दिल्लीवरून फोन आले, की हे बाबासाहेब आंबेडकरांचे विडंबन आहे. आंबेडकरी चळवळीचे प्रतिनिधी म्हणवता आणि फालतू कविता वाचत बसता? साहित्य संमेलनांमधील ‘थर्ड ग्रेड’ कवींसाठीही निमंत्रण देण्याच्या लायकीची तुमची कविता नाही.’