ससूनच्या आवारात कर्करोगावर उपचार करणारे स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्यासाठी जानेवारीअखेर शासनाकडे नव्याने प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र पुणे आणि मुंबईदरम्यानचे फारसे नसलेले अंतर आणि मुंबई येथे पूर्वीपासूनच कर्करोगासाठी कार्यरत असणारे टाटा मेमोरिअल सेंटर या दोन कारणांमुळे पुण्याच्या कर्करोग रुग्णालयाचे भवितव्य राज्यातील इतर ठिकाणाहून पाठवल्या जाणाऱ्या प्रस्तावांवर अवलंबून राहणार आहे. ससूनच्या उच्चपदस्थ सूत्रांनी ही माहिती दिली.
गेली २ वर्षे पुण्याच्या कर्करोग रुग्णालयासाठी वेगवेगळ्या स्वरूपात प्रस्ताव सादर केला जात असून जोपर्यंत निधी उपलब्ध होत नाही, तोपर्यंत या रुग्णालयाचे स्वप्न स्वप्नच राहणार आहे. राज्यातील इतर काही वैद्यकीय महाविद्यालयेही अशाच प्रकारच्या स्वतंत्र कर्करोग रुग्णालयासाठी प्रयत्न करत आहेत. केंद्राकडे जाणाऱ्या प्रस्तावांची छाननी होऊन एक प्रस्ताव निवडला जाणार असल्यामुळे मुंबईपासून दूर असलेल्या ठिकाणाहून आलेल्या प्रस्तावांना प्राधान्य मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे पुण्याच्या कर्करोग रुग्णालयाचे भवितव्य इतर प्रस्तावांवरच अवलंबून राहणार आहे.
याबरोबरच राज्यस्तरावरूनच कर्करोग रुग्णालयासाठीचे संपूर्ण अनुदान मिळवण्याचे प्रयत्नही ससूनकडून सुरू आहेत. यापूर्वी औंधला बावीस गुंठे जागेमध्ये हे रुग्णालय सुरू करण्याचे प्रयत्न होते. मात्र औंधला जाऊन वेगळ्या रुग्णालयाचे व्यवस्थापन नव्याने उभारणे जिकिरीचे असल्यामुळे तो प्रस्ताव बाजूला पडला.
काय आहे प्रस्ताव?
ससूनच्या आवारात ३६० खाटांचे कर्करोग रुग्णालय सुरू करण्यासंबंधीचा हा एकूण ३०० कोटी रुपयांचा प्रस्ताव असून तो दोन टप्प्यांत विभागलेला आहे. – यासाठी ससूनच्या शवागराजवळील महाराष्ट्र स्टेट रोज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (एमएसआरडीसी) जागेवर एफएसआय वाढवून मागण्यात आला आहे. कर्करोग रुग्णालयाच्या पहिल्या टप्प्यात २०० खाटा तर दुसऱ्या टप्प्यात १६० खाटांचे रुग्णालय कार्यरत होणे अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात रेडिओथेरपी, आँकोसर्जरी आणि मेडिकल आँकोलॉजी हे विभाग सुरू केले जाणार असून या फेजचे बांधकाम पूर्ण करण्यास १६० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. दुसऱ्या टप्प्यात आँकोपॅथोलॉजी, हेड अँड नेक सर्जरी, ऑब्सेट्रिक अँड गायनिक आँकोलॉजी हे विभाग सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या फेजसाठी १४० कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. ताजा प्रस्ताव मंजूर झाल्यास केंद्र सरकारकडून ७५ टक्के तर राज्याकडून २५ टक्के निधी येणे अपेक्षित आहे. सध्या एमएसआरडीसीची जागा ससूनला मिळणे तत्त्वत: मान्य झाले असले, तरी ती ससूनच्या हाती आलेली नाही.     
ससूनमधील सध्याच्या कर्करोगाविषयी सुविधा
सध्या रुग्णालयात सर्व प्रकारच्या कर्करोगग्रस्तांच्या तपासण्या, शस्त्रक्रिया व केमोथेरपी उपचार केले जातात. मात्र रेडिओथेरपीची सोय ससूनमध्ये नसल्यामुळे रुग्णांना इनलक्स बुधराणी आणि रुबी हॉल रुग्णालयात जावे लागते. या दोन्ही ठिकाणी रुग्णांना सवलतीच्या दरात तसेच ठरावीक रुग्णांना मोफत सुविधा मिळते.
ससूनचे कर्करोग रुग्णालय झाल्यास कर्करोगासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व अत्याधुनिक सुविधा रुग्णांना एकाच छताखाली मिळू शकतील. सध्या सध्या रुग्णांना ज्या आर्थिक सवलती मिळतात त्याच या रुग्णालयातही उपलब्ध होतील.