चार दशके एकत्रित वादन करणाऱ्या केडिया बंधूंची भावना

पुणे : अभिजात संगीतातील सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये वादन करण्याची संधी हा जीवनातील एका मोठय़ा स्वप्नपूर्तीचा आनंद  असल्याची भावना सतारवादक मोर मुकुट केडिया आणि सरोदवादक मनोज केडिया या बंधूंनी सोमवारी व्यक्त केली. गेली साडेचार दशके एकत्रित वादन करताना मिळणारा आनंद कानसेन रसिकांना देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे बुधवारपासून (११ डिसेंबर) ६७ व्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’ला सुरुवात होत आहे. महोत्सवात गुरुवारी (१२ डिसेंबर) केडिया बंधू यांची सतार आणि सरोदवादनाची मैफील होणार आहे. मूळचे झारखंड येथील मोर मुकुट केडिया आणि मनोज केडिया या बंधूंनी प्रारंभी उस्ताद अली अकबर खाँ यांच्याकडे शिक्षण आणि नंतर गुरुमॉँ अन्नपूर्णा देवी यांच्याकडे शिक्षण घेतले आहे.

आमचे वडील पं. शंभू दयाल केडिया हे ज्येष्ठ तबलावादक पं. किशन महाराज यांचे शिष्य आहेत. पं. किशन महाराज यांच्याप्रमाणे वडिलांनीही उस्ताद अली अकबर खाँ यांना तबलावादनाची साथसंगत केली आहे. मुलांनी सतारवादन शिकावे या इच्छेपोटी ते आम्हाला उस्ताद अली अकबर खाँ यांच्याकडे घेऊन गेले. आम्ही त्यांचे गंडाबंद शार्गीद झालो. अली अकबर खाँ यांचे वास्तव्य परदेशामध्ये असल्याने त्यांनीच अन्नपूर्णा देवी यांच्याकडे आम्ही शिक्षण घ्यावे, असे सुचविले. त्यानुसार १९७९ पासून आम्ही शिक्षणाला सुरुवात केली. आम्ही एकत्रित वादन करावे, असे वचन गुरुमाँ यांनी आमच्याकडून घेतले होते. त्यानुसार गेली चार दशके आम्ही एकित्रत वादन करतो. वाद्ये दोन असली तरी त्यातून रसिकांना एकाच वाद्याच्या स्वरांची अनुभूती देण्याचा आमचा प्रयत्न असतो, असे मनोज केडिया यांनी सांगितले.

चार दशकांपासून एकित्रत वादन करीत असलो तरी महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षांपासून आम्ही परिचित झालो. पं. मोहन दरेकर यांनी यापूर्वी आम्हाला पुण्यामध्ये निमंत्रित केले होते. या महोत्सवाची ख्याती जगभरात असल्याने येथे वादन करण्याची संधी मिळावी ही इच्छा होती. ती आता फलद्रूप होत असल्याचा आनंद झाला असल्याचे मोर मुकुट केडिया यांनी सांगितले.