नव्या अभ्यासक्रमामध्ये पुस्तकांची संख्या कमी करून शासनाने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे आणि डोक्यावरचेही ओझे कमी केले असले, तरी शाळांनी मात्र या हेतूलाच हरताळ फासला आहे. बहुतेक शाळांमध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठीही पुस्तकांची एक भली मोठी यादीच पालकांच्या हातात ठेवली जात आहे.
राज्यातील पहिली-दुसरीचे अभ्यासक्रम गेल्या वर्षीपासून राज्य शासनाने बदलले. या वर्षी तिसरी आणि चौथीचे अभ्यासक्रम बदलण्यात आले. या नव्या अभ्यासक्रमामध्ये पुस्तकांची संख्या कमी करून शासनाने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे आणि डोक्यावरचेही ओझे कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, शहरातील शाळांनी शासनाच्या या प्रयत्नांना हरताळ फासला आहे. बहुतेक शाळांमध्ये पालकांना नियमित दोन किंवा तीन पुस्तकांच्या जोडीला १० ते १२ पुस्तकांची यादी हातात ठेवली जात आहे. काही अतिउत्साही शाळांमध्ये तर पुस्तकांची यादी ही २० च्या घरात गेली आहे. या पुस्तकांबरोबरच वेगवेगळ्या विषयासाठी आणि उपक्रमांसाठी वह्य़ा आल्याच! त्यामुळे सध्या पहिलीच्या एका विद्यार्थ्यांचे दप्तर हे रोजची किमान पाच ते सहा पुस्तके आणि त्याच्या जोडीला वह्य़ा असे आहे.
पहिली आणि दुसरीसाठी इंग्रजी, मराठी, गणित अशी तीनच पुस्तके शासनाने ठरवून दिलेली आहेत. मात्र, पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांचे व्यवसाय, उपक्रम पुस्तिका, कवितांची पुस्तके, व्याकरणाची पुस्तके, इंग्लिश संवाद कौशल्याची पुस्तके, बुद्धिमत्ता चाचणीची पुस्तके अशी शासनाच्या पाठय़पुस्तकांव्यतिरिक्त अनेक पुस्तके शाळा पालक आणि मुलांवर लादत आहेत. ही सर्व पुस्तके खासगी प्रकाशकांची आहेत. अनेक शाळांनी या प्रकाशकांशीच संधान बांधले आहे. या शाळा पुस्तकांच्या नावाखाली पालकांकडून शुल्काव्यतिरिक्त रक्कम घेतात आणि विशिष्ट प्रकाशनाची पुस्तके विद्यार्थ्यांना शाळेकडून म्हणून पुरवली जातात. पुस्तकांसाठी म्हणून शाळा अगदी २ हजारांपासून ते ५ हजारांपर्यंत रक्कम आकारत आहेत. काही शाळा स्वत: पुस्तके देत नाहीत. मात्र, विशिष्ट प्रकाशनाचीच पुस्तके विशिष्ट दुकानांमधूनच घेण्याचे बंधन घातले जाते.
उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी पुस्तकांची ही जंत्री अत्यावश्यक असल्याचे शाळांचे म्हणणे आहे. मात्र, बालभारतीच्या नव्या पुस्तकांची रचनाच उपक्रमशील शिक्षणाला धरून केलेली आहे. शिक्षकांसाठीच्या माहिती पुस्तकामध्येही उपक्रम कसे घ्यावेत, याचे तपशील देण्यात आले आहेत. मात्र, शाळांच्या या उत्साहामुळे पालकांच्या खिशाला फटका बसतोच आहे. त्याचवेळी मुलांच्या दप्तराचे आणि डोक्यावरचे ओझेही वाढते आहे.