भौतिकशास्त्रातील योगदानासाठी प्रा. संजीव धुरंधर यांची अमेरिकन फिजिकल सोसायटीने (एपीएस) सन्मानिय सदस्य (फेलो) म्हणून निवड केली आहे. गुरुत्वीय भौतिकशास्त्र विभागाने केलेल्या शिफारसीनुसार संस्थेच्या सप्टेंबरमध्ये झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली असून, प्रा. धुरंधर यांची ही निवड भारतीय वैज्ञानिक जगतासाठी अभिमानास्पद आहे.

प्रा. धुरंधर यांनी १९८०-९०मध्ये आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्रात (आयुका) गुरुत्वीय लहरींसंदर्भातील संशोधन केले. गुरुत्वीय लहरींच्या संशोधनामध्ये प्रा. धुरंधर यांनी केलेले काम फारच महत्त्वाचे मानले जाते. या पार्श्वभूमीवर अमेरिकन फिजिकल सोसायटीने प्रा. धुरंधर यांची सन्माननीय सदस्य म्हणून निवड केली. ‘गुरुत्वीय लहरींच्या शोधासाठी आवश्यक भक्कम सैद्धांतिक पायाभरणीसाठी, विशेषत: विदा विश्लेषणाच्या पद्धतींसाठी, तसेच भारतात गुरुत्वीय लहरींबाबतचे संशोधन पुढे नेऊन लायगो इंडियाच्या स्थापनेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल प्रा. धुरंधर यांना हा बहुमान देण्यात येत आहे,’ असे एपीएसने निवडीसंदर्भातील प्रमाणपत्रात नमूद केले आहे.

सन्मानाविषयी प्रा. धुरंदर यांनी आनंद व्यक्त केला. ‘आयुकात संशोधन करताना गुरूत्वीय लहरींच्या माहितीचे विश्लेषण करण्याची पद्धती अलगॉरिदमच्या रुपात तयार केली होती. १९८९ पासून संशोधन सुरू होते. त्यानंतर खरोखर गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध करण्यात यश आले. त्यामुळे अमेरिकन फिजिकल सोसायटीने दिलेला सन्मान अभिमानास्पदच आहे. इतक्या वर्षांच्या परिश्रमाचे चीज झाल्यासारखे वाटले. नोबेल दर्जाच्या संशोधनातील सहभागाला मिळालेली ही दाद आहे असे मला वाटते. गेली तीस वर्षे या विषयावर सहकाऱ्यांसह संशोधन केल्याचे फळ म्हणून हा सन्मान मिळाला. अमेरिकन फिजिकल सोसायटीने आजवरची कामगिरी विचारात घेऊन या सन्मानाच्या माध्यमातून संशोधनाचे श्रेय दिले आहे.  आतापर्यंत गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व दाखवणाऱ्या पन्नास घटना लायगोने शोधून काढल्या असून आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन सहकार्याचाही हा सन्मान आहे. फार थोडय़ा भारतीय वैज्ञानिकांना हा सन्मान मिळाला आहे,’ असे प्रा. धुरंधर यांनी सांगितले.