News Flash

“सगळ्यांनी मदत तर केली, पण…” सोशल व्हायरल ‘वॉरिअर आजी’ पोटासाठी पुन्हा रस्त्यावर!

गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये शांताबाई पवार यांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात म्हणजे ऐन करोना लॉकडाउनच्या काळात एका आजीबाईंचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. कुटुंबाचं पोट भरण्यासाठी वयाच्या ८५व्या वर्षी करोनाच्या संकटातही या आजीबाई पुण्यातल्या रस्त्यांवर कसरती करून दाखवत होत्या. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि अनेकांनी त्यांना मदतीचा हात दिला. पण आता पुन्हा त्याच आजी पुन्हा करोनाचं संकट गडद झालेलं असताना पुण्याच्या रस्त्यांवर कसरती करताना दिसत आहेत. “मला सगळ्यांनी मदत केली, पण आमच्या घरातली मीच एकटी कमावती व्यक्ती आहे. जोपर्यंत जीव आहे, तोपर्यंत घरातल्यांचं पोट भरण्यासाठी मला हे काम करावंच लागणार आहे”, असं त्या सांगतात!

लॉकडाउनमध्ये आलं संकट!

शांताबाई पवार हे नाव गेल्या वर्षी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं. त्यांचा व्हिडिओ एका नेटकऱ्याने सोशल मीडियावर टाकला आणि बघता बघता तो व्हायरल झाला. आपली आणि आपल्या कुटुंबाची उपजीविका करणाऱ्या या ८५ वर्षीय शांताबाई पवार रस्त्यावर पारंपारिक लाठी-काठीच्या कसरती करून पैसे कमावतात. या वयातही ज्या चपळाईने आजीबाई काठी फिरवतात, ते पाहून अनेकांना आश्चर्य वाटतं. पण करोना काळात लॉकडाउनमध्ये त्यांच्याही उपजीविकेवर टाच आली होती. त्यामुळे रस्त्यावर काठी फिरवून येणाऱ्या-जाणाऱ्यांकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या मदतीवर त्या आपली उपजीविका चालवत होत्या.

पण त्यांचा काठी फिरवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यांच्याकडे मदतीचा ओघ सुरू झाला. बॉलिवुड अभिनेता सोनू सूद, रितेश देशमुख, गायिका नेहा कक्कड, महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेकांनी शांताबाई पवार यांना मदतीचा हात दिला. त्याची अजूनही शांताबाईंनी आठवण ठेवली आहे!

“आमच्यावरचं कर्ज पूर्ण फिटलं”

शांताबाई सांगतात, “गेल्या वर्षी मदत मिळाली होती. गृहमंत्र्यांनी एक लाख रुपये दिले होते. सोनू सूद यांनी एक लाख रुपये दिले होते. त्याशिवाय २४ हजार वेगळे दिले होते. त्यानंतर पुन्हा मी आजारी पडले, तेव्हा सोनू सूद यांनी १६ हजार रुपये दिले. रितेश देशमुख यांनीही एक लाख रुपये दिले. नेहा कक्कड यांनी एक लाख रुपये दिले. सगळ्यांनी मदत दिली. आमच्यावर आधी जास्त कर्ज होतं. ते कर्ज आता पूर्ण फिटलं आहे”, असं त्या सांगतात.

वॉरियर आजींनी Real Life बरोबरच Reel Life ही गाजवलंय; या चित्रपटात केलंय काम

पण तात्पुरत्या मदतीमुळे त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं पोट भरेना झालं. शेवटी त्यांना पुन्हा रस्त्यावर उतरून त्यांच्या दोन्ही काठ्या कसरतीसाठी हातात घ्याव्या लागल्या. “आम्ही गावाला घर बांधायला सुरुवात केली होती. अर्ध घर बांधून झालंय, पण पैसे अपुरे पडल्यामुळे अर्ध घर तसंच राहिलं आहे. गृहमंत्री साहेबांनी तिथल्या नगरसेवकांना सांगितलं होतं की आजीचं घर बांधून द्या. पण त्यांनी घर बांधून दिलं नाही. आता ते घर पावसाळ्यात पडून जाईल”, असं त्या सांगतात.

“जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत…!”

शांताबाई पवार यांच्या व्हिडिओवर अनेक सेलिब्रिटीज आणि नेटिझन्सनी कौतुकाचा वर्षाव केला होता. पण त्यानंतर त्यांना पुन्हा आर्थिक अडचण सतावू लागली. त्या सांगतात, “लोकं म्हणतात सरकारकडून मदत मिळाली तर तुम्ही कशाला रस्त्यावर जाता? पण माझ्या खात्यामध्ये काहीच नाहीये. मी सोबतच आणलंय खातं. मग मी रस्त्यावर नाही येणार तर माझ्या मुलांना कसं सांभाळणार? जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मी रस्त्यावर येतच राहणार, मुलांना सांभाळण्यासाठी.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 10:15 pm

Web Title: shantabai pawar social media viral video warrior grandmother again on pune roads pmw 88
Next Stories
1 पुण्यातील डॉक्टरचे कर्तव्यभान! वडिलांच्या मृत्यूनंतर लगेचच झाले कामावर रूजू, म्हणाले…
2 ‘मिशन वायू’अंतर्गत वैद्यकीय सज्जतेसाठी भेट
3 पुण्यात २५७९, पिंपरीत २१०२ नवे रुग्ण
Just Now!
X