सध्याच्या राजकारणात ओलाव्याची चणचण पाहायला मिळते. पूर्वी मतभेद असायचे. पण, आम्ही एकत्र असायचो. राजकीय संघर्ष केला. पण, वैयक्तिक ओलावा कमी होऊ दिला नाही. संघर्ष करून सत्तेवर या. धोरणं आखून ती राबविण्यासाठी कष्ट करा. राजकारणात वैचारिक संघर्ष जरूर करा. पण, त्याला वैयक्तिक संघर्षांचे स्वरूप येऊ देऊ नका. सूडाचे राजकारण करण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दात माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी कार्यकर्त्यांना आवाहन केले. सत्कार सोहळे बंद करून दुष्काळग्रस्त माणसाच्या डोळ्यांतले अश्रू पुसण्याचे काम करूया, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी बोलून दाखविली.
पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त रेसकोर्स मैदानावर झालेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. ज्येष्ठ उद्योजक सायरस पूनावाला, प्रफुल्ल पटेल, रामराजे नाईक-िनबाळकर, धनंजय मुंडे, अजित पवार, डॉ. पतंगराव कदम, जयंत पाटील, मधुकर पिचड, पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, गणेश नाईक, अरुण गुजराथी आणि प्रतिभा पवार या वेळी उपस्थित होत्या. महापौर दत्तात्रय धनकवडे, िपपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे यांनी महापालिकेतर्फे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण, िपपरी-चिंचवडतर्फे संजोग वाघेरे, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, निरंजन डावखरे, संग्राम कोते आणि आदिती तटकरे यांनी पवार यांचा सत्कार केला.
माझी बांधिलकी काळ्या मातीशी आणि या मातीमध्ये राबणाऱ्या शेतकऱ्याशी आहे. ही बांधिलकी अखेरचा श्वास सुरू असेपर्यंत ठेवेन, असे सांगून पवार म्हणाले, उद्योग, व्यापार, कारखानदारी, शिक्षण, कला क्षेत्रात अनेकांनी योगदान दिले. मात्र, बळीराजाने केलेले कष्ट आणि त्याने दिलेले योगदान हे भारताची प्रतिष्ठा वाढविणारे आहे. राज्यात आणि देशात वेगवेगळ्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली असली तरी माझ्या सार्वजनिक आयुष्याची सुरुवात पुणे जिल्ह्य़ातून झाली. यशवंतराव चव्हाण या परीसाच्या स्पर्शाने माझे जीवन घडले. राजकीय जीवनामध्ये एकेक पायरी चढत असताना पुणे जिल्ह्य़ाचा सामान्य माणूस आणि कार्यकर्ता सावलीसारखा उभा राहिला. संधी घेण्याची जबाबदारी स्वीकारावी लागते. या संधीमुळे महाराष्ट्र पाहता आला. राष्ट्रीय पातळीवर काम करताना देशामध्ये सर्वत्र जाण्याची संधी मिळाली. कृषिमंत्री असताना देश अन्न-धान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण करण्यासाठी काम करता आले.
पवार यांच्यामध्ये जन्मजात नेतृत्वगुण आहेत असे सांगत सायरस पूनावाला यांनी ५७ वर्षांच्या मैत्रीचे बंध उलगडले. नरसिंहराव यांच्या आधी पवार पंतप्रधान होतील असे वाटले होते. पण, काहींनी त्यांना धोका दिला, असेही पूनावाला म्हणाले. महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे करून जनतेला अच्छे दिन पवारसाहेबांनीच दाखविले, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. कदम म्हणाले, संरक्षणमंत्री झाल्यानंतर यशवंतराव पहिल्या स्थानी पोहोचतील असे वाटले होते. ते होऊ शकले नाही. मात्र, शरदराव तेथे जातील असे वाटले असतानाच भूकंप आणि मुंबई बॉम्बस्फोटामुळे त्यांना राज्यात परतावे लागले. महाराष्ट्राची संधी पुन्हा एकदा हुकली. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांनी मनोगत व्यक्त केले. अंकुश काकडे यांनी मानपत्राचे वाचन केले. दत्तात्रय धनकवडे यांनी आभार मानले.