मुंबई, ठाणे आणि पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनामध्ये युतीवरुन तंटा सुरु असला तरी पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांना हद्दपार करण्यासाठी शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पिंपरीत युतीचे डाव उधळून लावण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेससमोर आहे.

महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी अद्याप शिवसेना आणि भाजपमध्ये युतीबाबत खलबतं सुरु आहे. आता मकर संक्रातीनंतरच युतीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरुन भाजपने शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. तर ठाण्यातही शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष सुरु आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मात्र शिवसेना आणि भाजप एकत्र नांदण्यासाठी तयार असल्याचे दिसते. सेना, भाजप नेत्यांनी सूचक प्रतिक्रियाही दिली आहे. शिवसेना आडमुठी भूमिका घेणार नसून आता भाजपनेच २० जानेवारीपर्यंत युतीचा निर्णय घ्यावा असे शिवसेनेने म्हटले आहे. तर हेवे- दावे विसरुन आम्ही युतीसाठी सदैव तयार असल्याचे सांगत भाजपने युतीसाठी संमती दर्शवली आहे.

दरम्यान, भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी पिंपरीतील पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. सिंचन घोटाळ्यावरुन टीका करताना सोमय्या म्हणाले, अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यासंबंधीचे जे कागदपत्र दिले त्याआधारे फौजदारी कारवाई होणारच. अजित पवार आणि तटकरे हे तुरुंगात जाणारच असा दावाही त्यांनी केला आहे. सोमय्या यांनी थेट अजित पवारांना लक्ष्य केल्याने पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने राष्ट्रवादीला हद्दपार करण्याची मनसुबे रचल्याचे दिसते. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत अजित पवार विरुद्ध युती असे युद्ध रंगण्याची शक्यता आहे.

राज्यातील भाजप नेते आणि कार्यकर्ते ‘एकला चलो रे’ साठी आग्रही असताना युती गरजेची असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले होते. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी राज्यातील पालकमंत्री, जिल्हाध्यक्ष, संघटनमंत्र्यांची बैठक झाली. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस युतीबद्दल आग्रही असल्याचे दिसून आले. युती फुटल्याचा फायदा काँग्रेसला होऊ नये, यासाठी युती आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांची ही भूमिका पाहता पिंपरी चिंचवडमध्येही युती होणार या चर्चेला पाठबळ मिळाले आहे.