वाहतूक नियमाचा भंग करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्याचे काम खासगी ठेकेदारांना देण्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले असून या योजनेला स्थगिती का देऊ नये, याबाबत ‘कारणे दाखवा’ अशी नोटीस न्यायालयाने महापालिकेला दिली आहे. ‘मेरे अपने’ आणि ‘दलित सेना’ या संघटनांनी या योजनेच्या विरोधात ही याचिका दाखल केली आहे.
वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या दुचाकीस्वारांकडून दोनशे, तर चार चाकी वाहनचालकांकडून पाचशे रुपये दंड आकारण्याच्या योजनेला महापालिकेच्या मुख्य सभेने गेल्या महिन्यात बहुमताने मंजुरी दिली होती. हा दंड वसूल करण्याचे काम खासगी ठेकेदाराला दिले जाणार असल्यामुळे ही योजना चांगलीच वादग्रस्त ठरली होती.
दंडातील सत्तर टक्के रक्कम ठेकेदाराला मिळणार असल्यामुळे वसुली करणाऱ्यांच्या टोळ्या पुण्यात तयार होतील. या गुंडांमुळे जो त्रास पुणेकरांना होईल, जो उपद्रव होईल त्याच्याविरोधात कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न निर्माण होईल. ही परिस्थिती लक्षात घेऊन या योजनेला स्थगिती मागण्यासाठी आम्ही न्यायालयात दावा दाखल केला होता, असे ‘मेरे अपने’ संस्थेचे बाळासाहेब रुणवाल आणि ‘दलित सेने’चे सुनील यादव यांनी सांगितले. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकाला कायद्यातील तरतुदींनुसार पोलिसांनी दंड करावा, अशीच आमची भूमिका आहे, असेही ते म्हणाले.
वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात या दाव्याची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने हा दावा महापालिका न्यायालयात वर्ग केला. त्यानंतर महापालिका न्यायालयाचे न्यायाधीश सचिन मुंडे यांनी या योजनेला स्थगिती का देऊ नये याबाबत कारणे दाखवा नोटीस देण्याचा तसेच प्रशासनाने १ ऑक्टोबर रोजी म्हणणे सादर करण्याचा आदेश दिला.
दंडवसुलीचे काम महापालिकेच्या योजनेनुसार खासगी ठेकेदार करणार आहेत. या योजनेत महापालिकेपेक्षाही ठेकेदाराचाच फायदा अधिक होणार आहे. वसुलीचे काम गुंड प्रवृत्तीचे लोक सुरू करतील आणि ते घरोघरी जाऊन दंड वसूल करणार असल्यामुळे नागरिकांना अधिकच त्रास होईल. त्यासाठी हा दावा दाखल करावा लागत आहे, असे दाव्यात नमूद करण्यात आले आहे.
या योजनेमुळे पुणेकरांवर होणारा अन्याय दूर व्हावा यासाठी गिरीश शिंदे, मोहन वाडेकर, विनायक अभ्यंकर, तुलसी बोरकर, सुनील जगताप आणि बाळासाहेब खवळे या वकिलांनी स्वत:हून तयारी दर्शवली असून कोणतेही शुल्क न घेता ते काम करत असल्याचेही रुणवाल यांनी सांगितले.
दाव्यात काय म्हटले आहे..?
दंड वसुलीचा अधिकार महापालिकेला नाही
वसुलीमुळे गुंडांचा त्रास पुणेकरांना होईल
पालिकेची योजना ठेकेदारांच्या फायद्याची
पालिकेने आधी स्वत:ला शिस्त लावून घ्यावी