बालेवाडी जकात नाक्याच्या जागेची मागणी

स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने बालेवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या बहुपर्यायी वाहतूक केंद्र उभारणीच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. स्मार्ट सिटीने ट्रान्झिट हबच्या उभारणीसाठी खासगी गुंतवणूकदारांकडून स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव (एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट) मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी बालेवाडी जकात नाक्याच्या जागेची मागणी स्मार्ट सिटीकडून करण्यात आली असून येत्या महिन्याभरात खासगी गुंतवणूकादारांकडून प्राथमिक प्रस्ताव सादर झाल्यानंतर महापालिकेकडे स्मार्ट सिटीकडून अंतिम प्रस्ताव देण्यात येणार आहे.

स्वारगेट येथील महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या  प्रस्तावित मल्टिमॉडेल हबच्या धर्तीवरच बालेवाडी येथे नियोजित ट्रान्झिट हब उभारण्यात येणार आहे. मुंबई-बंगळुरू महामार्गावरून शहरात येणारी वाहतूक, महापालिकेची बीआरटी सेवा आणि पीएमआरडीएची प्रस्तावित शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिका अशा वाहतूक साधनांचा सहज वापर करता यावा यासाठी हे ट्रान्झिट हब नियोजित आहे. स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या गेल्या बैठकीमध्ये तसा इरादाही जाहीर करण्यात आला. त्यानंतर स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव मागविण्याची प्रक्रिया स्मार्ट सिटी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. ट्रान्झिट हब उभारणीसाठी सार्वजनिक- खासगी भागीदारी (पीपीपी) या तत्त्वानुसार ही उभारणी होणार असून त्यासाठी दीड हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

सध्या ट्रान्झिट हबच्या नियोजित जागेचा सविस्तर आराखडा करणे, सेवा वाहिन्यांच्या माहितीचे संकलन, महापालिका आणि शासकीय यंत्रणांकडून आवश्यक परवानगी घेणे, अशी कामे वास्तुविशारदकामार्फत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

असे आहे प्रस्तावित बहुपर्यायी वाहतूक केंद्र

  • पीएमआरडीएचे नियोजित हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोचे स्थानक
  • मुंबईहून येणाऱ्या लांब पल्लय़ाच्या एसटी बससाठी स्थानक
  • पीएमपी आणि बीआरटीसाठी स्थानक
  • पार्किंगसाठी सुविधांची उपलब्धता
  • खासगी वाहतुकीच्या साधनांचा समावेश
  • जागेचा व्यावसायिक कारणासाठी वापर

महापालिकेचा फायदा

प्रकल्प उभारणीसाठी २८० कोटींच्या अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकाची (एफएसआय) आवश्यकता आहे. त्यामध्ये महापालिकेने सवलत द्यावी, अशी मागणी स्मार्ट सिटीने केली आहे. साठ वर्षे भाडेकरारावर ही जागा ताब्यात घेण्यात येणार आहे. महापालिकेकडून मिळणाऱ्या परवानगी आणि सवलतींमुळे महापालिकेलाही यामध्ये सहाशे कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. मेट्रो मार्गिकेलगतच्या जागेवर ट्रान्झिट हब विकसित होणार असल्यामुळे महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार चार एफएसआय उपलब्ध होणार असून व्यावसायिक कारणासाठीही मोठी जागा उपलब्ध होणार आहे.