एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठातर्फे शुक्रवारपासून (१३ मार्च) दोन दिवसांची ‘स्मार्ट जेननेक्स्ट’ ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थिनींनी विद्यार्थिनींसाठी आयोजित केलेली परिषद हे त्याचे वेगळे वैशिष्टय़ आहे.
कर्वे रस्त्यावरील विद्यापीठाच्या तारापोर सभागृह येथे शुक्रवारी सकाळी दहा वाजता संगणतकज्ज्ञ दीपक शिकारपूर यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. कुलगुरू प्रा. वसुधा कामत परिषदेच्या अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. युवक आणि संस्कृती, युवक आणि आरोग्य, सामाजिक जबाबदाऱ्या, नीतिमत्ता आणि शाश्वत विकास यामध्ये युवकांची भूमिका अशा विषयांवर या परिषदेत ८२ विद्यार्थिनी आपले निबंध वाचन करणार आहेत. शनिवारी (१४ मार्च) दुपारी साडेतीन वाजता ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या उपस्थितीत या परिषदेचा समारोप होणार असून उपकुलगुरू प्रा. वंदना चक्रवर्ती अध्यक्षस्थान भूषविणार असल्याची माहिती एस.एन.डी.टी. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नलिनी पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.