छत्रपती शिवाजी महाराजांचे जललेणे असलेला ‘सिंधुदुर्ग किल्ला’आता रात्रीच्या अंधारातही उजळणार आहे. कारण ऐन समुद्रात उभ्या असलेल्या या देखण्या जलदुर्गाभोवती लवकरच प्रकाशयोजना साकारली जाणार आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग आणि स्थानिक सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने प्रत्यक्षात येऊ पाहणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आली.
सिंधुदुर्ग किल्ला हा मालवणसमोर दीड किलोमीटर आत ऐन समुद्रात उभा आहे. छत्रपती शिवरायांची निर्मिती, चारशे वर्षांचा इतिहास, विस्तीर्ण आणि देखणे स्थापत्य आणि या साऱ्याला लाभलेले निळय़ाशार सिंधुसागराचे सौंदर्य.. यामुळे हा जलदुर्ग पाहण्यासाठी देश-विदेशातील हजारो पर्यटक मालवणातील या बंदरावर येत असतात. ऐन समुद्रात असलेल्या या जलदुर्गाचे दिवसाउजेडी, होडय़ांच्या साहाय्याने दर्शन घेतात. पण आता या सिंधुदुर्ग दर्शनाला रात्रीच्या या प्रकाशसोहळय़ाचीही जोड मिळणार आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्याचा विस्तार १९ हेक्टरचा आहे. तब्बल साडेतीन किलोमीटर लांबीच्या त्याच्या या तटबंदीस ४२ बुरूज आहेत. या किल्ल्यात महादरवाजा, श्री शिवाजी मंदिर, राजवाडय़ाचे अवशेष, भगवतीदेवीचे मंदिर, गोडय़ा पाण्याच्या विहिरी, महाराजांच्या हाता-पायांचे ठसे असा ऐतिहासिक वास्तूंचा मोठा ऐवज दडलेला आहे. त्याची ही भव्यता दिवसाउजेडीदेखील डोळे दीपवून टाकते. आता याला रात्रीच्या या विविधरंगी प्रकाशयोजनेची झळाळी मिळणार आहे.
या योजनेत जलदुर्गाभोवतीच्या खडकांमध्ये हे दिवे बसवले जाणार आहेत. हे दिवे जलरोधक(वॉटरप्रूफ) आहेत. ही प्रकाशयोजना विविधरंगी असून त्यातून किल्ल्यातील प्रत्येक वास्तूला ओळख बहाल केली जाणार आहे. सलग दोन चाचण्यांनंतर या योजनेचा आराखडा तयार करून कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे पुरातत्त्व विभागाचे अधिकारी राजेश दिवेकर आणि समितीचे गुरुनाथ राणे यांनी सांगितले.
अशी प्रकाशयोजना असलेला सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला किल्ला ठरेल. या प्रकल्पाची किल्ल्यावर नुकतीच चाचणी घेण्यात आली. या वेळी विविधरंगी दिव्यांच्या प्रकाशात ही सारी ‘शिवलंका’ उजळून निघाली आणि तिच्या या सौंदर्याने साऱ्या मालवणालाच मोहिनी घातली गेली.