सर्वात जास्त गुण म्हणजे विज्ञान शाखा, त्या खालोखाल वाणिज्य शाखा आणि नंतर कला अशी वर्षांनुवर्षांचा पायंडा या वर्षी अकरावीला मोडीत निघाला आहे. सर्वाधिक गुण असलेल्या शहरातील पहिल्या तिन्ही विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेसाठी अर्ज केला आहे. त्याचप्रमाणे वाणिज्य शाखेसाठी या वर्षी विज्ञान शाखेपेक्षा अधिक अर्ज आले आहेत.
पुणे आणि िपपरी-चिंचवडमधील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आणि प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सोमवारी जाहीर झाली. या वर्षी पहिल्या फेरीत ५२ हजार ६१६ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून त्यातील ६ हजार ३९९ विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. विद्यार्थ्यांनी या वर्षी विज्ञान शाखेपेक्षाही वाणिज्य शाखेला अधिक प्राधान्य दिले आहे. विज्ञान शाखेसाठी साधारण ३६ हजार, तर वाणिज्य शाखेच्या इंग्रजी आणि मराठी माध्यमासाठी मिळून साधारण ३७ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. गुणवत्ता यादीत पहिल्या तिन्ही क्रमांकावर असलेल्या विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेला प्रवेश घेतला आहे. कला शाखेची परिस्थिती मात्र काहीच सुधारलेली नाही.
पहिल्या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ३० जूनपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत प्रवेश घ्यायचा आहे. दुसऱ्या फेरीत प्राधान्यक्रमानुसार वरचे महाविद्यालय (बेटरमेंट) मिळवण्याची संधी घ्यायची असेल, तरीही पहिल्या फेरीत मिळालेल्या महाविद्यालयांत पन्नास रुपये शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेणारे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर पडतील. या वर्षी अकरावीसाठी एकूण ७३ हजार ३८५ जागांसाठी ८२ हजार १०६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.