News Flash

ब्रॅण्ड पुणे : सुजाता मस्तानी

थोडय़ाच दिवसांत येथे आइस्क्रीम सोबत मस्तानीही मिळू लागली.

पुणे आणि काही खाद्यपदार्थ यांचे एक वेगळे नाते असते. तो पदार्थ, तो निर्माता, तो दुकानदार याची एक स्वतंत्र ओळख असते.

आंबा म्हटले की जसा हापूसच डोळ्यापुढे येतो, तसेच मस्तानी म्हणजे सुजाता हे गृहीत सत्य झाले आहे. पुण्याच्या सदाशिव पेठेतील निंबाळकर तालीम चौकात कोणे एकेकाळी रावजी मामा कोंढाळकर यांचे पानाचे दुकान होते आणि त्या दुकानात बर्फही मिळत असे; एवढाच काय तो या दुकानाचा थंडपणाशी संबंध होता. मात्र शरदराव कोंढाळकर, जे महाराष्ट्र सरकारच्या सेवेत होते, त्यांनी या पानाच्या दुकानाशेजारचे एक बंद पडू लागलेले किराणामालाचे दुकान भाडय़ाने घेऊन त्या जागी थंड पेये आणि आइस्क्रीम विकायचा घाट घातला आणि १९६७-६८ मध्ये सुजाता या आपल्या मुलीच्या नावाने आइस्क्रीमचे दुकान सुरू केले. थोडय़ाच दिवसांत येथे आइस्क्रीम सोबत मस्तानीही मिळू लागली.

मस्तानी हा काही कोंढाळकर यांचा शोध नाही, तसा त्यांचा दावाही नाही. पूर्वी ‘दूध कोल्ड्रिंक’मध्ये आइस्क्रीम घालून हा पदार्थ विकला जात असे. मात्र त्यात बर्फ आणि साधे दूध व आइस्क्रीम यांचे मिश्रण असे. सुजाता दुकानाने यात बदल केले. बर्फाच्या जागी आइस्क्रीम, दूध साधे न वापरता दाट आटवलेले आणि वर आइस्क्रीमचा गोळा असे लोभस स्वरूप आणि जिभेवर रेंगाळणारी चव असणारे पेय तयार झाले.

अगदी आरंभी ३० पैसे आइस्क्रीम आणि ८० पैसे मस्तानी असा भाव होता. (पेट्रोलही सुमारे १ रुपया चाळीस पैसे होते तो काळ) सुरुवातीस ‘रोझ मिल्क’ आणि त्यात तरंगणारा पिस्ता आइस्क्रीमचा गोळा असेच स्वरूप होते. मग नेहमीचे ग्राहक काही तरी वेगळे म्हणून विविध स्वरूपात मागणी करू लागले म्हणजे पिस्ता आंबा, रोझ आंबा, आंबा चॉकलेट आणि यातूनच विविध फ्लेवर्स तयार झाले. आइस्क्रीम करण्याच्या विविध प्रकारांपैकी पॉट आइस्क्रीम प्रकार सुजाताने स्वीकारला. दुधाचा वापर करताना ते आटवून घेणे आणि नैसर्गिक फळे किंवा त्याचा गर यांचाच वापर केल्याने एक उत्तम चव लोकांच्या जिभेवर आणि मनावर ठसू लागली आणि ‘सुजाता मस्तानी’ने जम धरला.

कालांतराने म्हणजे १९८० च्या सुमारास इमारतीचे नूतनीकरण आणि विकास झाला. सुजाताला आपली हक्काची मोक्याची आणि मोठी जागा मिळाली आणि मग काय, सगळे कुटुंबच यात गर्क झाले. नवी जागा, नवा थाट, नवनवीन प्रकार यामुळे कीर्ती दिगंत झाली आणि मे महिन्यात या चौकात रात्रीही ट्रॅफिक जॅम होऊ लागला.

आता विस्तार वाढला, माल निर्मितीसाठी दोन ठिकाणी कारखाने सुरू झाले. निंबाळकर तालीम येथे दोन दुकाने आणि शहरभर अन्यत्र २३ ठिकाणी सुजाता मस्तानी मिळू लागली. तरीही नैसर्गिक फळांचा, गराचा वापर, दूध आटवलेलेच वापरायचे याबाबत मालक मंडळी आजही आग्रही आहेत.

आता हा उद्योग एका कुटंबाचा राहिला नसून प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा झाला आहे. शरदरावांची पुढची पिढी यात कार्यरत आहे. वाघोलीपासून खडकवासल्यापर्यंत आता सुजाता मस्तानी मिळते; ती हळूहळू पुणे जिल्हाभर कशी मिळेल याचा विचार सचिन कोंढाळकर करीत असतात.

सुजाता ही चव आहे..सुजाता ही मस्तानी आहे.. सुजाता हा ब्रँड आहे..

charubhide@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 4:34 am

Web Title: sujata mastani in pune
Next Stories
1 डॉ. वैशाली जाधव दोषमुक्त
2 ‘आरटीओ’तील विविध प्रश्न सोडविण्याची राज्याच्या नव्या परिवहन आयुक्तांकडून अपेक्षा
3 मध्य प्रदेशातील शस्त्रास्त्रांच्या तस्करीत पसार असलेल्या आरोपींना एटीएसने पकडले
Just Now!
X