स्वाईन फ्लूमुळे पुण्यात आणखी दोन रुग्णांचे मृत्यू झाले असून मृतांमध्ये अहमदनगरच्या तरुणीसह बारामतीच्या मध्यमवयीन पुरुषाचाही समावेश आहे. या मृत्यूमुळे जानेवारीपासून आतापर्यंत पुण्यात मृत्यू पावलेल्या स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या २४ झाली असून यातील ११ रुग्ण पुण्याचे होते, तर १३ रुग्ण बाहेरून पुण्यात उपचारांसाठी आले होते.
सोनाबाई नामदेव वाघमोडे (वय २१) या अहमदनगरला राहणाऱ्या तरुणीचा रविवारी पुण्यातील रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. स्वाईन फ्लूच्या संसर्गासह गंभीर जंतुसंसर्ग आणि न्यूमोनियामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या उपचारांना दोन दिवसांचा उशीर झाला होता. बारामतीचे कृष्णा शंकर हरिहर (वय ५०) यांचाही स्वाईन फ्लूमुळे मंगळवारी मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. स्वाईन फ्लूसह गंभीर जंतुसंसर्ग आणि फुफ्फुसांना सूज (अक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम) आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. त्यांच्या उपचारांनाही ३ दिवसांचा उशीर झाला होता.
जानेवारीपासून आतापर्यंत पुण्यात २८९ जणांना स्वाईन फ्लू झाला आहे. यापैकी १५० रुग्ण पूर्णत: बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या स्वाईन फ्लू झालेले ११६ रुग्ण शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून यातील २४ जणांना कृत्रिम श्वासोश्वासावर ठेवण्यात आले आहे. आणखी ३२ संशयित रुग्णही रुग्णालयांत दाखल आहेत.